रात्रीच्या वेळी विनापरवाना व बेकायदा लाकडाची वाहतूक करणाऱ्या ट्रकचालकाला वनविभागाने सापळा रचून ताब्यात घेतले.
लांजा- रात्रीच्या वेळी विनापरवाना व बेकायदा लाकडाची वाहतूक करणाऱ्या ट्रकचालकाला वनविभागाने सापळा रचून ताब्यात घेतले. सोमवारी रात्री १० वाच्या सुमारास भांबेड गावी केलेल्या कारवाईत ताब्यात घेण्यात आलेल्या ट्रक आणि लाकूड या मुद्देमालाची किंमत सुमारे २० लाख रुपये इतकी आहे. तालुक्यात वनविभागाची ही सर्वात मोठी कारवाई असून यामुळे अवैध लाकूड विक्री करणा-यांचे धाबे दणाणले आहेत.
लांजा तालुक्याच्या काही भागातून लाकडाची बेसुमार वृक्षतोड व विनापरवाना लाकूड वाहतूक सुरू असल्याची माहिती लांजा वनविभागाला प्राप्त झाली होती. त्यानुसार वनविभागाने ही वाहतूक रोखण्यासाठी रात्रीच्या वेळी गस्तीत वाढ केली होती.
२३ रोजी रात्रीच्या सुमाराला एका ट्रकमधून विनापरवाना लाकूड वाहतूक केली जाणार असल्याची माहिती वनविभागाला मिळाली होती. त्यानुसार सोमवारी रात्री तालुक्यातील भांबेड गावातील महालक्ष्मी मंदिरानजीक सापळा रचण्यात आला होता. रात्री १०च्या सुमारास एका ट्रकमधून लाकूड वाहतूक होत असल्याचे लक्षात आल्यानंतर वनपाल व्ही. वाय.गुरवळ यांनी ट्रक थांबवण्याचा प्रयत्न केला, मात्र वनविभागाच्या अधिका-यांना पाहताच ट्रकचालकाने भांबेडमार्गे कोल्हापूरकडे पलायन करण्याचा प्रयत्न केला.
त्यानंतर वनपाल गुरवळ यांनी आपल्या वाहनाद्वारे या ट्रकचा पाठलाग करत त्याला भांबेड-हर्दखळेदरम्यान थांबवले. यावेळी ट्रकची तपासणी केली असता; ट्रकमध्ये मोठय़ा प्रमाणात लाकूड साठा असल्याचे आढळले. याबाबत ट्रकचालक बाबू जनार्दन चौधरी (रा. कोपार्डे, ता. करवीर, जि. कोल्हापूर) याच्याकडे लाकूड वाहतुकीबाबतचा परवाना नसल्याचे स्पष्ट झाले.
लाकडाची विनापरवाना व बेकायदा वाहतूक केल्याप्रकरणी वनविभागाने ट्रकचालकाला ताब्यात घेतले. या कारवाईत सुमारे २० लाख रुपयांचा ट्रक व लाकूडसाठा ताब्यात घेण्यात आला. वनपाल व्ही. वाय. गुरवळ यांच्या मार्गदर्शनाखाली वनरक्षक पाटील, वनमजूर गोरख खेडेकर यांनी केलेली ही लांजा तालुक्यातील आजवरची सर्वात मोठी कारवाई आहे.