जगज्जेता विश्वनाथन आनंदला जगज्जेतेपदाच्या लढतीत पहिला पराभव शुक्रवारी पाचव्या डावात स्वीकारावा लागला.
चेन्नई- जगज्जेता विश्वनाथन आनंदला जगज्जेतेपदाच्या लढतीत पहिला पराभव शुक्रवारी पाचव्या डावात स्वीकारावा लागला. आव्हानवीर आणि अव्वल मानांकित नॉर्वेच्या मॅग्नस कार्लसनने पांढरी मोहरी घेऊन खेळताना आनंदला ५८व्या चालीत पराभव मान्य करण्यास भाग पाडले. जवळपास साडेपाच तास रंगलेल्या या लढतीत कार्लसनने सुरुवातीपासूनच प्रभावी चाली केल्या.
आनंदने सेमी स्लाव डिफेन्स प्रकारातील मार्शल गॅम्बिट हे आगळेवेगळे ओपनिंग केले. मात्र कार्लसन त्यावर डगमगला नाही. त्याने १२व्या चालीला कॅसलिंग केले तेव्हाच हा डाव बराच काळ रंगणार हे संकेत मिळाले होते. १५व्या चालीला वजिरावजिरी झाली. त्यापाठोपाठ खेळ रंगतच गेला. जवळपास ४०व्या फेरीनंतरच आनंदचा पराभव ठळक दिसू लागला होता. कार्लसनही निर्धास्तपणे खेळत होता. आनंदने शक्य तितके प्रयत्न केले मात्र ते अपयशी ठरले. पटावर राजा, हत्ती आणि दोन प्यादी अशा समान स्थिती आनंदला वाचवू शकली नाही.
आनंदकडे पांढ-या मोह-या
आनंद शनिवारी (१६ नोव्हेंबर) सहाव्या डावात पांढ-या मोह-यांनी खेळणार आहे. लढतीत तिस-यांदा आनंद पांढ-या मोह-यांनी खेळताना दिसेल.