नव्वदीत गाजलेल्या ‘मॅचफिक्सिंग’ प्रकरणातही सट्टेबाजांनी दक्षिण आफ्रिकेचा तत्कालीन कर्णधार हॅन्सी क्रोनिएला जाळ्यात ओढण्यासाठी एका मुलीचाच वापर केला होता.
इंडियन प्रीमियर लीगमधील (आयपीएल) क्रिकेटपटूंना ‘स्पॉटफिक्सिंग’च्या दलदलीत खेचण्यासाठी सट्टेबाज ललनांचा वापर करत असल्याचे दिल्ली पोलिसांच्या चौकशीत पुढे आले. आणि हे कटुसत्य ऐकून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला. पण ललनांच्या साहाय्याने खेळाडूंना भुरळ घालून जाळ्यात ओढण्याची ही पहिलीच वेळ नाही. नव्वदीत गाजलेल्या ‘मॅचफिक्सिंग’ प्रकरणातही सट्टेबाजांनी दक्षिण आफ्रिकेचा तत्कालीन कर्णधार हॅन्सी क्रोनिएला जाळ्यात ओढण्यासाठी एका मुलीचाच वापर केला होता.
राजस्थान रॉयल्स संघाचे तीन खेळाडू एस. श्रीशांत, अजित चंडिला व अंकित चव्हाण यांना आयपीएलच्या तीन सामन्यांत स्पॉटफिक्सिंग केल्याच्या आरोपाखाली दिल्ली पोलिसांनी अटक केली. त्यामुळे ‘जंटलमन्स गेम’ म्हणून संबोधल्या जाणा-या क्रिकेटच्या आड चाललेल्या काळा धंदा पुन्हा उजेडात आला. मात्र खेळाडूंना गळाला लावण्यासाठी सट्टेबाज मुलींचाही वापर करत असल्याची बाब तर आणखी लाजीरवाणी होती. दिल्ली पोलिसांच्या चौकशीत पैशांसह खेळाडूंना मुली पुरवल्याची बाबही पुढे आली. विशेष म्हणजे दिल्ली पोलिसांनी वांद्रे-कार्टर रोड परिसरातून जेव्हा श्रीशांतला अटक केली, त्या वेळी त्याच्यासोबत तीन मुलीही होत्या. त्यानंतर श्रीशांतच्या लॅपटॉपमध्ये अनेक मुलींचे फोटो व काही आक्षेपार्ह वस्तू आढळल्या आहेत.
दिल्ली पोलिसांनीही बुकींचे संभाषण रेकॉर्ड केले. त्यातही त्यांनी श्रीशांत व चंडिलाला कमीत कमी तीन वेळा मुली पुरवण्यात आल्याची बाब पुढे आली. पुढे करण्यात आलेल्या चौकशीत सट्टेबाज चंद्रेश पटेल ऊर्फ चांद आणि मनन यांच्या चौकशीतूनही या माहितीला दुजोरा मिळाला होता. गुन्हे शाखेच्या पोलिसांनी वांद्रे येथील श्रीशांत राहिलेल्या हॉटेलचे सीसीटीव्ही चित्रीकरण मिळवले असून, त्याच्या पाहणीत या प्रकरणावर अधिक प्रकाश पडेल. पण सट्टेबाज एवढयावरच थांबणार नव्हते, तर पुढे ललनांच्या साहायाने खेळाडूंची आक्षेपार्ह चित्रफीत तयार करून त्यांना ब्लॅकमेल करण्याचाही त्यांचा कट होता.
सट्टेबाजांची कार्यप्रणाली फार जुनी आहे. क्रिकेटचा काळाकुट्ट अध्याय असलेल्या मॅचफिक्सिंमध्येही परदेशी खेळाडूंना गळाला लावण्यासाठी प्रभावीपणे इंग्रजी बोलणा-या मुलींची निवड केली होती. सोज्ज्वळ क्रिकेटपटू म्हणून ओळख असलेल्या हॅन्सी क्रोनिएलाही मुलगी पुरवण्यात आली होती. त्या वेळीही दिल्लीच्या एका सट्टेबाजाच्या दूरध्वनी संभाषणातून ही बाब त्या वेळी पुढे आली होती. त्यासाठी बुकींनी मुंबईत वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या एका मुलीला फसवले होते. त्या वेळी ड्रग्जमाफियाही या ऑपरेशनमध्ये सहभागी झाले होते. कुख्यात ड्रग्जमाफिया बटला व विक्की यांनीच या मुलीला शोधून काढले व त्यानंतर लक्ष्मीकांत ठाणे या ठाण्याच्या सट्टेबाजामार्फत क्रोनिएपर्यंत पोहोचवले होते. त्यासाठी या मुलीला ४० हजार रुपये देण्याचे ठरले होते. वैद्यकीय शिक्षणासाठी झालेला खर्च भरून काढण्यासाठी ही मुलगी या दलदलीत उतरली होती.
पूर्वी मुंबईतील बडया व्यक्तींच्या पार्टीची शान बनलेल्या या मुलीची अशाच एका पार्टीत ड्रग्जमाफियांशी ओळख झाली होती. त्यातून हा पूर्ण डाव रचण्यात आला आहे. त्या वेळीही दक्षिण मुंबईत एका हॉटेलमध्ये थांबलेल्या क्रोनिएसाठी वांद्रय़ातील एका अपार्टमेंटमध्ये सट्टेबाजांनी विशेष सोय केली होती. तो येण्याच्या आधी तेथे ही मुलगीही उपस्थित होती. त्या वेळीही सट्टेबाजांनी मुलीचा वापर करून क्रोनिएला मॅचफिक्सिंगबाबत विचारण्याचे ठरवले होते. त्यानुसार सर्व व्यवस्थित झाले, मात्र क्रोनिए या वेळी एवढा दारू प्यायला की, त्यामुळे सट्टेबाजांना त्याच्याशी मॅचफिक्सिंगबाबत बोलताच आले नाही. त्यानंतर क्रोनिए त्याच्या ठरल्या कार्यक्रमानुसार दिल्लीला रवाना झाला. पुढे दिल्लीच्या बुकींनीही क्रोनिएसाठी दिल्लीत ‘हनी ट्रॅप’ रचला व त्याला मॅचफिक्सिंगमध्ये सामील करण्यात यशस्वी ठरले.
मॅचफिक्सिंग प्रकरण पुढे आले आणि क्रोनिए वृत्तपत्रांची हेडलाइन बनला. त्या वेळी वैद्यकीय शिक्षण घेणारी ती मुलगी भलतीच घाबरली व तिने मुंबई सोडून हैदराबाद गाठले. या वेळी तिने तिचे वैद्यकीय शिक्षणही पूर्ण केले नव्हते. पुढे या प्रकरणी देशभर सुरू झालेल्या अटक सत्रात कुलाबा परिसरात छापा टाकून पोलिसांनी ड्रग्जमाफिया बटला व विक्की या दोघांनाही अटक केली. त्या वेळी क्रोनिए आणि या मुलीबाबतची माहिती पुढे आली होती. त्या वेळी पोलिसांसह अनेक क्रिकेटपटूंनी आश्चर्याने तोंडात बोटे घातली होती. काळानुसार सट्टेबाज आणि सट्टेबाजांत अनेक बदल झाले आहेत. मॅचफिक्सिंग करणारे सट्टेबाज आता स्पॉटफिक्सिंगला पसंती देऊ लागले आहेत. पण खेळाडूंना जाळ्यात ओढण्यासाठी आजही सट्टेबाज ललनांचाच वापर करत आहेत आणि भविष्यातही त्याचा वापर होणार यात वाद नाही.