मुंबई – बीडीडी चाळींच्या पुनर्विकास प्रकल्पात पात्रतेच्या अटी पूर्ण केल्यावर करारनामा होईल. रहिवाशांना टू बीएचकेचे पाचशे स्क्वेअर फुटांचे घर मोफत मिळणार आहे. त्यामुळे पुन्हा सुरू होणा-या बायोमेट्रिक्सला रहिवाशांनी सहकार्य करावे, असे आवाहन म्हाडाच्या वतीने करण्यात आले. तर या चाळीतील झोपडय़ा व स्टॉलधारकांचे झोपडपट्टी पुनर्विकास प्रकल्पाअंतर्गत पुनर्वसन होईल, आश्वासनही म्हाडाच्या करण्यात आले.
नायगाव व ना. म. जोशी मार्गावरील बीडीडी चाळींच्या पुनर्वसन प्रकल्पात रहिवाशांच्या मनातील शंका दूर करण्यासाठी नायगाव येथील श्रीकृष्ण सभागृहात सभा आयोजित केली होती.
या प्रकल्पाची महारेरा अंतर्गत नोंदणी केली जाईल. त्यामुळे प्रकल्पाला कायद्याचे संरक्षण आहे, प्रकल्पात पारदर्शकता आहे, असे गृहनिर्माण राज्यमंत्री रवींद्र वायकर म्हणाले. प्रकल्पात लॉटरी पद्धतीने सदानिकांचे वाटप करण्याची सूचना वायकर यांनी केली.