यूएफा चँपियन्स लीग फुटबॉल स्पर्धेत गुरुवारी बायर्न म्युनिचने मँचेस्टर सिटीला ३-१ असे रोखले.
फ्रँकफर्ट – यूएफा चँपियन्स लीग फुटबॉल स्पर्धेत गुरुवारी बायर्न म्युनिचने मँचेस्टर सिटीला ३-१ असे रोखले. अन्य लढतीत रेआल माद्रिदने कोपनहेगनवर ४-० अशा फरकाने विजय मिळवला. घरच्या मैदानावर शाख्तर डॉनेट्स्कने मँचेस्टर युनायटेडला १-१ बरोबरीत रोखले.
रिबेरी, म्युलर, रॉबेनचे गोल
मँचेस्टरमध्ये फ्रँक रिबेरी, थॉमस म्युलर आणि अर्जेन रॉबेनच्या गोलांच्या जोरावर मँचेस्टर सिटीला सहज हरवणे, बायर्न म्युनिचला शक्य झाले. सातव्या मिनिटालाच रिबेरीने बायर्नचे खाते खोलले. मध्यंतरापर्यंत आघाडी राखण्यात त्यांना यश आले. मात्र उत्तरार्धात चार मिनिटांच्या फरकाने दोन गोल करत म्युनिचने आघाडी वाढवली. पेप गार्डिओला यांच्या मँचेस्टर सिटीला केवळ एकमेव गोल करता आला. सामना संपायला ११ मिनिटे शिल्लक असताना अल्विरो नीग्रेडोने तो गोल केला. बायर्नने सलग विजय नोंदवताना ‘डी ग्रूप’मध्ये अव्वल स्थान पटकावले.
रोनाल्डो, मारियाचा ‘डबल’ धडाका
माद्रिदमध्ये बुधवारी झालेल्या ‘बी ग्रूप’मधील लढतीत कमकुवत कोपनहेगन एफसीविरुद्ध रेआल माद्रिदने वर्चस्व राखले. ‘स्टार’ फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डो आणि अँजेल डि मारियाने प्रत्येकी दोन गोल करताना यजमानांचा गोलांचा चौकार पूर्ण केला. या दोन गोलांसह रोनाल्डोने दोन लढतींमधील वैयक्तिक गोलांची संख्या पाचवर नेली.
युनायटेडला बरोबरीत रोखले
डॉनेट्स्कमध्ये बुधवारी झालेल्या ‘ए ग्रूप’मधील लढतीत शाख्तर डॉनेट्स्कने मँचेस्टर युनायटेडला १-१ असे बरोबरीत रोखले. १८व्या मिनिटालाच डॅनी वेलबेकने युनायटेडचे खाते उघडले होते. दुस-या सत्रातील अर्धा तासापर्यंत आघाडी राखण्यात युनायटेडला यश आले. मात्र ७६व्या मिनिटाला टायसनने शाख्तरला बरोबरी गाठून देत पराभव टाळला. या बरोबरीमुळे मँचेस्टर युनायटेड आणि शाख्तरचे प्रत्येकी चार गुण झालेत.
मिट्रोग्लोची हॅटट्रिक
‘बी ग्रूप’मधील अन्य लढतीत ऑलिंपिकोस पिरॅइसने अँडरलेक्टला ३-० असे हरवले. स्ट्रायकर काँस्टांटिनोस मिट्रोग्लोची हॅटट्रिक हे त्यांच्या विजयाचे प्रमुख वैशिष्टय़ ठरले.
पॅरिस सेंट-जर्मनचा विजय
‘सी ग्रूप’मध्ये बुधवारी पॅरिसमध्ये पॅरिस सेंट जर्मनने बेन्फिकावर ३-० असा विजय मिळवला. झाल्टन इब्राहिमोविकचे दोन गोल त्यांच्या विजयाचे प्रमुख वैशिष्टय़ ठरले. ‘बी ग्रूप’मध्ये गालतासराय आणि ज्युवेंट्समधील लढत २-२ अशी बरोबरीत सुटली.
जुर्गन लॉप यांच्या बंदीमध्ये वाढ
बोरुसिया डॉर्टमंडचे व्यवस्थापक युगॅन क्लॉपवरील बंदीच्या मुदतीत वाढ करण्यात आल्याने आर्सेनलविरुद्धच्या लढतीत डॉर्टमंडला ‘बॉस’विना खेळावे लागेल. गेल्या महिन्यात प्रतिस्पर्धी नॅपोलीविरुद्धच्या लढतीत मैदानावरील पदाधिका-यांशी आक्षेपार्ह वर्तन केल्याप्रकरणी ४६ वर्षीय क्लॉप यांच्यावर एका सामन्याची बंदी घालण्यात आली. मात्र चँपियन्स लीगच्या आयोजन समितीने त्या घटनेची पुन्हा पडताळणी करताना मुदतीत वाढ करण्याचा निर्णय घेतला.