फेडरल रिझव्र्हकडून व्याजदर वाढीच्या धूसर शक्यतेने गुंतवणूकदारांमध्ये सलग दुस-या दिवशी उत्साह कायम राहिला.
मुंबई- फेडरल रिझव्र्हकडून व्याजदर वाढीच्या धूसर शक्यतेने गुंतवणूकदारांमध्ये सलग दुस-या दिवशी उत्साह कायम राहिला. याबरोबरच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जीएसटीची अंमलबजावणी डेडलाईननुसार करण्याच्या आश्वासनामुळेही खरेदीचा हुरूप वाढला.
याबरोबरच मुंबई शेअर बाजाराने सलग पाचव्या सत्रात तेजीची घोडदौड कायम ठेवत सेन्सेक्सने १४७.३३ अंकांच्या वाढीसह २६,९३२.८८वर झेप घेतली. तर राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीत ३३.६० अंकांची वाढ होऊन हा निर्देशांक ८,१५२.९०वर बंद झाला.
भारतीय आणि जर्मनीच्या उद्योजकांना आश्वस्त करताना जीएसटीची अंमलबजावणी २०१६पासून होण्याबाबत आशा व्यक्त केली. तसेच गुंतवणूकदारांना दीर्घकाळापासून भेडसावणा-या समस्यांचे निराकारण करण्यासाठी सरकारकडून निर्णायक पावले उचलली जात असल्याचे ते म्हणाले. त्याच वेळी अर्थखात्याने घसरणा-या कर्जदरांचा लाभ संपूर्ण अर्थव्यवस्थेला देण्यासाठी सरकार प्रयत्न करेल, या आश्वासनानंतर गुंतवणूकदारांमध्ये अधिक उत्साह संचारला.
दरम्यान, देशाच्या सेवा क्षेत्रातील नरमाईच्या सर्वेक्षणानंतर आलेल्या नफेखोरीने माहिती-तंत्रज्ञान, तंत्रज्ञान, बँकिंग आणि ऊर्जा क्षेत्रातील कंपन्यांच्या शेअरला फटका बसला.
मात्र बाजारात यानंतरही खरेदीतील सातत्य कायम राहून सत्राअखेरीस निर्देशांक तेजीसह बंद होण्यास मदत झाली. पाच सत्रांमध्ये सेन्सेक्समध्ये १,३१६ अंकांची वाढ झाली आहे. याबरोबरच या निर्देशांकाने दीड महिन्यांतील उच्चांकी पातळी गाठली.
पंतप्रधान आणि अर्थमंत्री यांनी जीएसटी कराची २०१६पासून अंमलबजावणी करण्याबाबत विश्वास व्यक्त केल्याचा बाजाराला मोठा फायदा झाल्याचे रेलिगेअर सिक्युरिटीजचे अध्यक्ष जयंत मांगलिक यांनी सांगितले. सेन्सेक्समध्ये टाटा मोटर्सने ५.८१ अंकांसह सर्वाधिक कमाईची नोंद केली.
कमॉडिटींच्या किमतीतील वाढ, कंपन्यांचे चांगले तिमाही निकाल येण्याची आशा व परदेशी गुंतवणूकदारांकडून होणारी खरेदी यामुळे बाजारात उत्साह वाढला.