दिल्लीत भरधाव बसमध्ये तरुणीवर झालेल्या बलात्काराच्या घटनेचा बुधवारीही संसंदेत निषेध करण्यात आला.
नवी दिल्ली – दिल्लीत भरधाव बसमध्ये तरुणीवर झालेल्या बलात्काराच्या घटनेचा बुधवारीही संसंदेत निषेध करण्यात आला. संसदेबाहेर भारतीय जनता पक्षाच्या महिला खासदारांनी विरोधीपक्ष नेत्या सुष्मा स्वराज यांच्या नेतृत्वाखाली निदर्शने केली. भाजपच्या महिला खासदारांनी आरोपींना कठोरात कठोर शिक्षा देण्याची मागणी केली.
रविवारी रात्री वैद्यकशाखेच्या विद्यार्थिनीवर भरधाव बसमध्ये सामूहिक बलात्कार करुन तिला बाहेर फेकून देण्यात आले होते. मंगळवारी संसदेच्या दोन्ही सभागृहात सर्वपक्षीय खासदारांनी या घटनेचा तीव्र शब्दात निषेध केला होता. यावेळी महिला खासदारांनी बलात्का-यांना फासावर लटकवण्याची मागणी केली.
केंद्रीयगृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी सभागृहाच्या तीव्र भावना लक्षात घेऊन या प्रकरणाचा खटला जलदगती न्यायालयात चालविण्याची घोषणा केली तसेच दिल्लीच्या सर्व प्रमुख रस्त्यांवर रात्रीच्यावेळी पीसीआर गाडया तैनात करण्याची घोषणा केली होती. बीपीओ, कॉलसेंटरमध्ये नोकरी करणा-या महिला कर्मचा-यांकडून वापरल्या जाणा-या विशेष मार्गावर गस्त वाढविण्याचे शिंदे यांनी आश्वासन दिले.