क्षयरोग तपासणीसाठी दवाखान्यात आलेल्या २७ वर्षाच्या महिलेवर बलात्कार करणा-या डॉ. रुस्तम सुनावाला यांना ११ जूनपर्यंत अटक करू नये, असे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाचे न्या. अभय ठिपसे यांनी नुकतेच पोलिसांना दिले.
मुंबई- क्षयरोग तपासणीसाठी दवाखान्यात आलेल्या २७ वर्षाच्या महिलेवर बलात्कार करणा-या डॉ. रुस्तम सुनावाला यांना ११जूनपर्यंत अटक करू नये, असे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाचे न्या. अभय ठिपसे यांनी नुकतेच पोलिसांना दिले. या महिलेने डॉ. सुनावाला यांच्यावर बलात्काराचा आरोप केला असला तरी, ते पोलिसांकरवी स्वत:ची रक्त आणि वीर्य चाचणी करण्यास तयार आहेत,’ असे त्यांचे वकील आबाद पोंडा यांनी उच्च न्यायालयास सांगितले. या प्रकरणाची सुनावणी न्या. ठिपसे यांच्यासमोर झाली असता त्यांनी हे निर्देश दिले. पोलिसांना या डॉक्टरच्या वैद्यकीय चाचण्या कराव्याशा वाटल्यास, त्यांनी खार पोलिसांना सहकार्य करावे, असेही न्यायालयाने सांगितले.
डॉ. सुनावाला यांचा खार येथे दवाखाना असून, क्षयरोगाने त्रस्त असलेली महिला त्यांच्याकडे १७ मे रोजी तपासणीसाठी गेली होती. तपासणी करताना डॉक्टरने आपल्यावर बलात्कार केल्याची तक्रार तिने पोलिसांत केली. या प्रकरणी डॉ. सुनावाला यांनी सत्र न्यायालयात धाव घेऊन, आपली रक्त आणि वीर्य चाचणी करावी, असा अर्ज केला पण तो न्यायालयाने फेटाळला. आपल्याला अटक झालेली नसल्याचेही त्यांनी अर्जात नमूद केले होते. सत्र न्यायालयाकडून दिलासा न मिळाल्यामुळे डॉ. सुनावाला यांनी उच्च न्यायालयात अर्ज केला. ‘बलात्काराच्या गुन्ह्यातील आरोपीला ५३(ए) नुसार स्वत:ची रक्त आणि वीर्य चाचणी पोलिसांनी करावी, अशी मागणी करण्याचा अधिकार आहे,’ असे अॅड. पोंडा यांनी न्यायालयास सांगितले.
रक्त आणि वीर्य चाचणीचा अहवाल येईपर्यंत पोलिसांनी डॉ. सुनावाला यांना अटक करू नये, चाचणी अहवाल सकारात्मक आल्यास बलात्काराचा आरोप सिद्ध होईल आणि निरपराध व्यक्तीच अशी चाचणी करण्यास तयार होऊ शकतो, असा युक्तिवाद अॅड. पोंडा यांनी केला. मात्र, वरिष्ठ सरकारी वकील प्राजक्ता शिंदे यांनी या चाचण्यांना विरोध केला.
‘आरोपी स्वत:ची रक्त आणि वीर्य चाचणी करण्यासाठी तयार असताना पोलिस त्याला विरोध का करत आहेत, चाचणी सकारात्मक आल्यास त्याचे परिणाम आरोपीला (डॉ. सुनावाला) भोगावे लागतील, आरोपीच्या या चाचणीला विरोध करताना त्याची पुरेशी कारणे बचाव पक्षाने (पोलिसांनी) दिलेली नाहीत, पोलिसांनी डॉ. सुनावाला यांच्या या दोन चाचण्या करून त्याचा अहवाल सत्र न्यायालयासमोर ठेवावा,’ असे न्या. ठिपसे यांनी सांगितले. पण न्यायालयाची ही सूचना पोलिसांनी मान्य केली नाही.
‘अन्य आरोपीही परवानगी मागतील’
डॉ. सुनावाला यांच्या अर्जाला सरकारी वकील प्राजक्ता शिंदे यांनी विरोध केला. आरोपीच्या अर्जावर न्यायालयाने मंजुरी दिल्यास अशाच गुन्ह्यातील अन्य आरोपी असाच अर्ज न्यायालयास करतील, असे अॅड. शिंदे या वेळी म्हणाले.