दिल्लीतील बलात्काराच्या घटनांची पाळेमूळे शोधून काढण्यासाठी कठोर पाऊले उचलावीत असे आदेश दिल्ली उच्च न्यायालायने दिले आहेत.
नवी दिल्ली – दिल्लीत वाढणा-या बलात्काराच्या घटनांची पाळेमूळे शोधून काढण्यासाठी सरकार आणि पोलिसांनी कठोर पाऊले उचलावीत असे आदेश दिल्ली उच्च न्यायालायने दिले आहेत.
गेल्या काही महिन्यांपासून दिल्लीमध्ये बलात्कारांच्या गुन्ह्यात लक्षणीय वाढ झाली आहे. त्यामुळे अशा घटनांची पाळंमूळं त्वरीत शोधून काढावीत, असे आदेश दिल्ली उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश डी.मुरुगन सेन यांच्या खंडपीठाने दिले आहेत.
दिल्लीत वाढणा-या गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या घटना थोपवण्यासाठी दिल्ली पोलिसांची कुमक कमी पडते असे सांगण्यात आले होते. त्यावर बोलताना खंडपीठाने गेल्या काही दिवसांपासून दिल्लीत चूकीच्या घटना घडत आहेत. त्यामुळे अशा घटना थोपवण्यासाठी प्रयत्न करण्याची आवश्यकता असल्याचे खंडपीठाने स्पष्ट केले.
डिसेंबरमध्ये चालत्या बसमध्ये बलात्कार झाल्याची घटनेनंतरही पाच वर्षांच्या मुलीवर झालेल्या बलात्काराच्या घटनेमुळे देशात पुन्हा ठिकठिकाणी आंदोलन पेटले. त्यामुळे आता दिल्ली पोलिसांनी पुढाकार घेऊन पोलिसांना अत्याधुनिक प्रशिक्षण देण्यासाठी अहवाल सादर करण्यास न्यायालयाने सांगितले.
या सुनावणी दरम्यान न्यायालयाने पाच वर्षाच्या मुलीवर झालेल्या बलात्कार प्रकरणात आंदोलन करणा-या महिलांवर पोलिसाने केलेल्या मारहाणीचाही उल्लेख न्यायालयाने केला. बलात्काराच्या घटनांची संवेदनशीलता लक्षात घेऊन पोलिसांनी त्याप्रमाणेच वर्तन केले पाहिजे असे खडे बोलही खंडपीठाने पोलिसांना लगावले.
दरम्यान, दिल्लीतील बलात्कारीत पिडित तरुणींना ज्या रुग्णालयात दाखल केले जाते त्या रुग्णालयांची नावे आणि संबंधित इतर माहितींचा स्टेट्स अहवाल दिल्ली सरकारच्या आरोग्य मंत्रालय आणि पोलिसांनी न्यायालयात सादर केला.