एखाद्या पक्षाची जाहिरात करण्यासाठी, त्या पक्षाला अनुकूल असलेले बनावट जनमत चाचण्यांचे निष्कर्ष प्रसिद्ध करण्याच्या प्रकारांची निवडणूक आयोगाने गंभीर दखल घेतली आहे.
नवी दिल्ली- एखाद्या पक्षाची जाहिरात करण्यासाठी, त्या पक्षाला अनुकूल असलेले बनावट जनमत चाचण्यांचे निष्कर्ष प्रसिद्ध करण्याच्या प्रकारांची निवडणूक आयोगाने गंभीर दखल घेतली आहे. अशा प्रकरणांमध्ये योग्य ती कारवाई करण्याची सूचना निवडणूक आयोगाने केंद्र सरकारला केली आहे.
अलीकडेच एका वृत्तवाहिनीने स्टींग ऑपरेशन करून अशा प्रकारच्या बनावट जनमत चाचण्यांचे बिंग फोडले होते. त्यानंतर या जनमत चाचण्यांविरोधात काँग्रेसने निवडणूक आयोगाकडे तक्रार केली होती. बनावट जनमत चाचण्या प्रसिद्ध करणा-यांविरोधात गुन्हेगारी प्रकरणे दाखल करावीत व यामध्ये जे पक्ष गुंतले आहेत, त्यांना निवडणूक लढवण्यास बंदी घालावी, अशी मागणी काँग्रेसने केली होती.
काँग्रेसने केलेली ही तक्रार विचारात घेतल्यानंतर निवडणूक आयोगाने कंपनी व्यवहार खाते आणि माहिती आणि प्रसारण खात्याशी पत्रव्यवहार करून काही सूचना केल्या आहेत. अवैध मार्गाने पैसे मिळवण्याच्या मोबदल्यात जनतेची दिशाभूल करण्यासाठी खोटी माहिती प्रसिद्ध करण्याच्या उद्देशाने केलेले हे कारस्थान असल्याचा आरोप या तक्रारीत असल्याचे दिसत आहे.
त्यामुळेच या प्रकारांची तातडीने दखल घेऊन सरकारने त्यांना योग्य वाटेल ती कारवाई करावी, अशी सूचना भारतीय निवडणूक आयोगाचे प्रधान सचिव अजय कुमार यांनी केली आहे. दरम्यान, निवडणूक आयोगाने घेतलेल्या या निर्णयावर काँग्रेसने समाधान व्यक्त केले आहे.