स्वित्झर्लंडलडच्या रॉजर फेडररने पाठदुखीमुळे माघार घेतल्याने अव्वल मानांकित सर्बियाच्या नोवाक जोकोविचला हंगामातील अखेरच्या एटीपी वर्ल्ड टूर फायनल्स टेनिस स्पर्धेचे जेतेपद राखता आले.
लंडन- स्वित्झर्लंडलडच्या रॉजर फेडररने पाठदुखीमुळे माघार घेतल्याने अव्वल मानांकित सर्बियाच्या नोवाक जोकोविचला हंगामातील अखेरच्या एटीपी वर्ल्ड टूर फायनल्स टेनिस स्पर्धेचे जेतेपद राखता आले.
रविवारी लढतीपूर्वीच पाठदुखीमुळे माघार घेत असल्याचे फेडररने जाहीर केले. त्यामुळे जोकोविचला सलग तिस-यांदा ही स्पर्धा जिंकता आली. इतकेच नाही तर त्याला वर्षाचा शेवटही अव्वल रॅँकिंग राखत करता आला. याउलट फेडररची कारकीर्दीत सातव्यांदा ही स्पर्धा जिंकण्याची संधी हुकली. तत्पूर्वी, फेडररने शनिवारी त्याचा देशबंधू स्टॅनिस्लास वावरिंकाला नमवण्यासाठी तीन तास झुंज दिली होती. याउलट जोकोविचने उपांत्य फेरीत जपानच्या की निशीकोरीचे आव्हान परतवून लावले होते.
डेव्हिस कपमधील सहभाग अनिश्चित
दुखापतग्रस्त फेडरर शुक्रवारपासून सुरू होणा-या डेव्हिस चषकाच्या अंतिम फेरीत स्वित्झर्लंडलडचे प्रतिनिधित्व करण्याबाबत प्रश्नचिन्ह आहे. अंतिम फेरीत स्वित्झर्लंडलडची फ्रान्सचे आव्हान आहे.
ब्रायन बंधूंना जेतेपद
अमेरिकेच्या बॉब आणि माइक या ब्रायन बंधूंनी कारकीर्दीत चौथ्यांदा एटीपी वर्ल्ड टूर फायनल्स पुरुष दुहेरीचे जेतेपद पटकवले. या जोडीने अंतिम फेरीत क्रोएशियाचा इवान डॉडिग आणि ब्राझीलचा मार्सेलो मेलो यांचा ६-७, ६-२, १०-७ पराभव केला. ब्रायन बंधूंचे एटीपीतील हे एकत्रितपणे १०३वे जेतेपद ठरले.