फुकट वडापाव न दिल्याच्या रागातून विलेपार्ले पश्चिमेतील ‘तृप्ती फरसाण मार्ट’च्या दुकानदाराला बेदम मारहाण करणा-या शिवसेनेच्या ‘झुंडशाही’विरोधात राज्यभरातून तीव्र संताप व्यक्त होत आहे.
मुंबई – फुकट वडापाव न दिल्याच्या रागातून विलेपार्ले पश्चिमेतील ‘तृप्ती फरसाण मार्ट’च्या दुकानदाराला बेदम मारहाण करणा-या शिवसेनेच्या ‘झुंडशाही’विरोधात राज्यभरातून तीव्र संताप व्यक्त होत आहे. या गुंडगिरीला रोखठोक उत्तर देत ‘स्वाभिमान’ संघटनेचे संस्थापक अध्यक्ष तथा काँग्रसचे युवा आमदार नितेश राणे यांच्या नेतृत्वाखाली स्वाभिमान संघटनेने शिवसैनिकांना मोफत वडापाव वाटप करत मुंबईत अभिनव आंदोलन केले.
वडापाव विक्रेत्या दुकानदाराला मारहाण केल्याचा निषेध नोंदवताना ‘आम्ही तुम्हाला फुकट वडापाव देत आहोत. तुम्ही खा आणि एन्जॉय करा. मात्र कुणाला त्रास देऊ नका आणि मारू नका’!.. असे चिमटेही नितेश राणे यांनी ट्विटरवरून काढले आहेत.
दादर टीटी, प्रीतम हॉटेल परिसरात ‘स्वाभिमान’तर्फे मोफत वडापाव वाटप करण्यात आले. ‘स्वाभिमान’चे मुंबई प्रमुख सत्पाल वाबळे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. आंदोलनात संकेत बावकर, राज पटेल, संतोष कुबल, सुनील मिरगे, अग्नेलो फर्नाडिस, हर्षद पाटील, मिथिलेश सिंग, अभय गावडे, नीलेश गावडे, संदीप बाटले, सुनील मेलेकर, रुपेश गांगण, विकास पवार, प्रकाश बेनबन्सी यांच्यासह कार्यकर्ते सहभागी झाले होते.
ही लाजिरवाणी बाब..
शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाचा वापर करून सत्तेवर आलेल्या शिवसेनेला बाळासाहेबांच्या नावाने सुरू असलेल्या क्रिकेट सामन्यांसाठी सर्वसामान्य दुकानदारांना मारहाण करून फुकट वडापाव मागण्याची वेळ येते, ही लाजिरवाणी बाब आहे. यापुढे शिवसनिकांना कुठल्याही मदतीची गरज पडल्यास ‘स्वाभिमान’ संघटनेकडे हात पसरावेत, आम्ही त्यांना मदत करू. परंतु त्यांनी सर्वसामान्य जनतेची, व्यापा-यांची अडवणूक करू नये, असे स्वाभिमान संघटनेचे अध्यक्ष नितेश राणे यांनी सांगितले.