प्रयोगशील तरुण दिग्दर्शक म्हणून अल्पावधीतच स्वत:ची वेगळी ओळख निर्माण करणारा दिग्दर्शक सुजय डहाके सध्या ‘फुंतरू’ या आपल्या आगामी चित्रपटाच्या कामात बिझी आहे.
प्रयोगशील तरुण दिग्दर्शक म्हणून अल्पावधीतच स्वत:ची वेगळी ओळख निर्माण करणारा दिग्दर्शक सुजय डहाके सध्या ‘फुंतरू’ या आपल्या आगामी चित्रपटाच्या कामात बिझी आहे. इरॉस इंटरनॅशनलची पहिली मराठी कलाकृती तसेच या चित्रपटात मुख्य भूमिका साकारणा-या केतकी माटेगावकरच्या लक्षवेधी लुकमुळे सुरुवातीपासूनच चच्रेत असलेल्या ‘फुंतरू’ या सिनेमातील रोमँटिक गाण्याचे ध्वनिमुद्रण नुकतंच पुण्यातील डॉन स्टुडिओमध्ये करण्यात आलं.
इरॉस इंटरनॅशनलची प्रस्तुती आणि क्रिशिका लुल्ला यांची निर्मिती असलेला ‘फुंतरू’ हा मराठीतील पहिलाच सायन्स फिक्शन चित्रपट आहे. स्पाईस स्टुडिओज् अॅण्ड एंटरटेनमेंट प्रा. लि. आणि अजय ठाकूर या चित्रपटाचे सहनिर्माते आहेत. या चित्रपटात एक लव्ह स्टोरी पाहायला मिळणार आहे. या चित्रपटात मुख्य भूमिका साकारणा-या अभिनेत्री-गायिका केतकी माटेगावकरने ऋषिकेश रानडेसोबत या चित्रपटातील रोमँटिक गीत गायलं आहे.
‘फुंतरू’च्या निमित्ताने केतकी आणि ऋषिकेश यांनी प्रथमच एकत्र गाणं गायलं आहे. सध्याचा आघाडीचा गीतकार मंदार चोळकर याच्या लेखणीतून साकारलेलं ‘मनाला मनाची ओढ लागते पुन्हा पुन्हा..’ हे गीत ऋषिकेश दातार, जसराज जोशी आणि सौरव भालेराव या संगीतकार त्रिकुटाने संगीतबद्ध केलं आहे.
या गाण्याविषयी बोलताना केतकीने सांगितले की, ‘मनाला मनाची ओढ लागते पुन्हा पुन्हा..’ हे गीत ऋषिकेश रानडेसारख्या गायकाबरोबर गाण्याची संधी मिळाल्याने मला खूप आनंद झाला. ऋषिकेशबरोबर हे द्वंद्व गीत गाताना एक वेगळाच मूड जमून आला. मंदार चोळकर यांनी लिहिलेल्या या गाण्याला ऋषिकेश दातार, जसराज जोशी आणि सौरव भालेराव यांनी अप्रतिम संगीत दिलं आहे. मी यापूर्वी गायलेली गाणी जशी संगीतप्रेमींच्या ओठांवर सहज रुळली तसं हे गाणंही अनाहुतपणे ओठांवर सजणारं आहे.
केतकीसोबत प्रथमच गाणं गाण्याच्या अनुभवाबाबत ऋषिकेश म्हणाला, ‘केतकी ही खूप उत्तम गायिका आहे. यामुळेच ती आज अभिनयासोबतच गायनातही यशस्वी आहे. तिच्यासोबत एक रोमँटिक साँग गाताना खूप मजा आली.’
‘फुंतरू’मध्ये केतकीसोबत मदन देवधर, शिवराज वायचळ, शिवानी रांगोळे, ऋतुराज शिंदे, अंशुमन जोशी, रोहित निकम आदी कलाकारांच्या भूमिका आहेत. ‘फुंतरू’ हा चित्रपट १२ फेब्रुवारी २०१६ रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.