भारताचे माजी नौदल अधिकारी कुलभूषण जाधव यांना सुनावण्यात आलेली फाशी रद्द करण्यासाठी त्यांच्या आईने पाकिस्तानी न्यायालयात धाव घेतली आहे.
नवी दिल्ली- भारताचे माजी नौदल अधिकारी कुलभूषण जाधव यांना सुनावण्यात आलेली फाशी रद्द करण्यासाठी त्यांच्या आईने पाकिस्तानी न्यायालयात धाव घेतली आहे. कुलभूषण जाधव यांची फाशी रद्द करण्यासाठी भारतीय दूतावासाकडून कुलभूषण यांच्या आई अवंती जाधव यांच्या नावाने पाकिस्तानच्या न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे.
कुलभूषण जाधव यांच्यासोबत संपर्क साधता यावा, यासाठी भारताकडून १६ व्यांदा कॉन्स्युलर अॅक्सेससाठी अपील करण्यात आले आहे. भारताकडून कॉन्स्युलर अॅक्सेससाठी करण्यात आलेली १५ अपील आतापर्यंत पाकिस्तानकडून रद्द करण्यात आली आहेत. पाकिस्तानचे राजदूत अब्दुत बासित यांनी भारत आणि पाकिस्तानमधील २००८ च्या कराराद्वारे फक्त सामान्य कैदी आणि मच्छिमारांसाठीच कॉन्स्युलर अॅक्सेस दिला जातो. कुलभूषण जाधव हे भारताचे हेर असल्याने त्यांना कॉन्स्युलर अॅक्सेस दिला जाऊ शकत नाही. त्यामुळेच पाकिस्तानने कुलभूषण जाधव प्रकरणात कॉन्स्युलर अॅक्सेसची मागणी फेटाळली आहे असे सोमवारी म्हटले होते.
कुलभूषण जाधव यांना पाकिस्तानी लष्करी न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली आहे. या सुनावणीदरम्यान आणि कुलभूषण जाधव यांना फाशीची शिक्षा सुनावतेवेळीची न्यायालयीन कागदपत्रे, पुराव्यांची माहिती, वैद्यकीय अहवालांची मागणी भारताकडून करण्यात आली आहे. यासोबतच जाधव यांच्या बचावासाठी एक वकील पुरवण्याची आणि त्यांच्या कुटुंबीयांना पाकिस्तानचा विसा देण्याची मागणीदेखील भारताकडून करण्यात आली आहे.