बच्चेकंपनीसाठी दिवाळी म्हटलं की, नवीन कपडे विकत घेणे, किल्ले बनवणे आणि फटाके फोडणे बस्स.
मुंबई- बच्चेकंपनीसाठी दिवाळी म्हटलं की, नवीन कपडे विकत घेणे, किल्ले बनवणे आणि फटाके फोडणे बस्स. दिवाळी आठवडयावर आली असतानाच, शाळांमधील सामाईक परीक्षा संपल्याने फटाके खरेदी करण्यासाठी मुलांची दुकानात एकच झुंबड उडालेली आहे. तर, अनार, फुलबाजा, लवंग, रॉकेट, लक्ष्मीबार, कलर पेन्सील, बॉम्ब, भूचक्र, अशा फटक्यांसह आकाशात उंचावर जाऊन फुटणारे आणि कमी आवाजाचे चायना फटके मुलांचे आकर्षण ठरत आहेत.
पूर्वी आवाजाच्या फटक्यांना मोठी मागणी होती. मात्र, मोठया आवाजाच्या फटाक्यांमुळे ध्वनिप्रदूषण अधिक होते. त्यामुळे सध्या पर्यावरणाला कमी हानी पोहोचवणारे तसेच आकाशात नयनरम्य आतशबाजी करणारे फटाके घेण्याकडे मुलांचा कल आहे. तर, अधिक पैसे खर्च करून विना आवाजाचे फटाके खरेदी करणा-यांची संख्याही वाढत असल्याची माहिती एका दुकानदाराने दिली.
चिनी फटाक्यांसोबत लहानग्यांची सर्वात आवडती वस्तू म्हणजे बंदूक. बंदुकातील टिकल्या फोडत आजही अनेक मुले चोर-पोलिसाचा डाव खेळताना दिसतात. यामुळे यंदाही इतर फटाक्यांसह बंदूक आणि टिकल्यांची मोठी विक्री झाली आहे.
दरम्यान, महागाईमुळे फटाक्यांच्या किमतीतही वाढ झाली आहे. तरीही फटके खरेदी करणा-या लहान मुलांचा उत्साह काही कमी झालेला नाही. या वर्षीही बाजारात नवनवीन प्रकारचे फटाके उपलब्ध झाले आहेत. तर अनेक पालक आवर्जून नवीन फटके खरेदी करत आहेत.
गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा फटाक्यांच्या किमती वाढल्या आहेत. मात्र, त्याचा विक्रीवर परिणाम झालेला नाही.- राजेश माने, दुकानदार