आयपीएलच्या धर्तीवर आता कबड्डीचीही लीग होणार आहे. मशाल स्पोर्ट्स प्रायव्हेट लिमिटेड आणि आंतरराष्ट्रीय कबड्डी फेडरेशनच्या संयुक्त विद्यमाने होणारी प्रोफेशनल (प्रो) कबड्डी लीग जुलै-ऑगस्ट २०१४ मध्ये आठ फ्रँचायझी संघांत भारतातील आठ प्रमुख शहरांत रंगेल.
![Shivaneri seva mandal Kabbadi Mahostav,,photo arun patil,,19-10-12](http://prahaar.in/wp-content/uploads/2012/10/Kabbadi-300x215.jpg)
मुंबई – आयपीएलच्या धर्तीवर आता कबड्डीचीही लीग होणार आहे. मशाल स्पोर्ट्स प्रायव्हेट लिमिटेड आणि आंतरराष्ट्रीय कबड्डी फेडरेशनच्या संयुक्त विद्यमाने होणारी प्रोफेशनल (प्रो) कबड्डी लीग जुलै-ऑगस्ट २०१४ मध्ये आठ फ्रँचायझी संघांत भारतातील आठ प्रमुख शहरांत रंगेल. या लीगमध्ये भारतासह परदेशातील कबड्डीपटू सहभागी होणार आहेत.
मुंबईतील नॅशनल स्पोर्ट्स क्लब ऑफ इंडियामध्ये (एनएससीआय) शुक्रवारी प्रो कबड्डी लीगची घोषणा करण्यात आली. यावेळी मशाल स्पोर्ट्सचे सह-प्रवर्तक आनंद महिंद्रा तसेच आंतरराष्ट्रीय कबड्डी संघटनेचे अध्यक्ष जनार्दन सिंग गेहलोत, मुंबई शहर कबड्डी संघटनेचे अध्यक्ष आमदार भाई जगताप आदी मान्यवर उपस्थित होते.
प्रो-लीगमध्ये मुंबईसह बंगळूरु, चेन्नई, दिल्ली, जयपूर, कोलकाता, पटना आणि पुणे असे आठ फ्रँचायझी संघ असतील. त्यात रोनी स्क्रुवाला, राजेश शाह (मुकुंद ग्रुप), किशोर बियानी, जीएमआर, मुरुगुप्पा ग्रुप आदी संघमालकांचा समावेश आहे. वरील आठ फ्रँचायझीमध्ये ‘होम’ आणि ‘अवे’ सामने होतील. संघांची नावे तपशील तसेच बक्षिसेही अद्याप जाहीर करण्यात आलेली नाहीत.
जवळपास १०० कबड्डीपटूंचा लिलाव होणार
प्रो-कबड्डी लीगसाठी जवळपास १०० कबड्डीपटूंचा लिलाव केला जाईल. त्यापैकी ७२ कबड्डीपटू भारतातील असतील. अन्य कबड्डीपटूंमध्ये अफगाणिस्तान, बांगलादेश, कॅनडा, इंग्लंड, श्रीलंका, थायलंड, तुर्कमेनिस्तान, अमेरिका, व्हिएतनाम आणि झिम्बाब्वे आदी देशांतील कबड्डीपटूंचा समावेश आहे.