गरोदर मातांना बाळंतपणानंतर मातृत्व अनुदानातून सरकारी रक्कम देण्यात येते. मात्र, वसई पंचायत समिती अंतर्गत येणा-या पारोळ प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिका-याने या रकमेवरच डल्ला मारला आहे.
ठाणे – गरोदर मातांना बाळंतपणानंतर मातृत्व अनुदानातून सरकारी रक्कम देण्यात येते. मात्र, वसई पंचायत समिती अंतर्गत येणा-या पारोळ प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिका-याने या रकमेवरच डल्ला मारला आहे. डॉ. सुरेश चव्हाण असे या वैद्यकीय अधिका-याचे नाव आहे.
गेल्या पाच वर्षापासून चव्हाण हे या केंद्रात वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. केंद्र व राज्य सरकारकडून विविध योजना या केंद्रामार्फत रुग्णांसाठी राबवण्यात येतात. यात आशा योजना, पल्स पोलिओ, नसबंदी शस्त्रक्रिया, मातृत्व अनुदान योजना आदींचा समावेश आहे. मात्र, या योजना राबवताना सरकारी निर्णय व परिपत्रकेतील निकष धाब्यावर बसवण्यात आलेले आहेत. त्यातच वैद्यकीय अधिकारी चव्हाण हे या सरकारी रकमेचा वेळोवेळी गैरवापर करत असल्याचे उघडकीस आले आहे. चव्हाण यांचे चांदिप येथील ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत खाते आहे.
या खात्यातून त्यांनी वेळोवेळी स्वत:च्या नावे खासगी कामासाठी पैसे काढले आहेत. गेल्या चार महिन्यापूर्वी मातृत्व अनुदान वाटप करायचे असल्याचे सांगून वेळोवेळी १ लाख १८ हजार रुपयांची रक्कम काढण्यात आलेली आहे. मात्र, ही रक्कम या योजनेंतर्गत वाटप न करता ती आपल्या खासगी कामासाठी वापरण्यात आली असल्याचे उघडकीस आले आहे. या रक्कम अपहारप्रकरणी पारोळ केंद्रात गदारोळ झाल्यानंतर चव्हाण यांनी, ही रक्कम काढली नसल्याचे बँकेला कळवले आहे. तर या रकमेचा धनादेश खोटी सही करून तत्कालीन लिपिकाने अपहार केल्याचे मांडवी पोलिसांना कळवले आहे.
मात्र, बँकेने प्रतिष्ठेचा प्रश्न निर्माण करून ही रक्कम वैद्यकीय अधिका-यांच्या खात्यात जमा केली आहे. वास्तविक या अपहारानंतर संबंधितांना खोटय़ा सह्या करुन सरकारी रकमेचा अपहार केल्याचा गुन्हा दाखल करणे आवश्यक होते. तसे न करता या अपहार प्रकरणात बँक, पोलीस खाते व संबंधित वैद्यकीय अधिकारी सामील झाल्याचे उघडकीस आले आहे. यापूर्वीही चव्हाण यांनी सरकारी खात्यातून अनेक रकमा काढल्या असून संबंधित योजनांचा लेखाजोखा केल्यास अनेक धक्कादायक खुलासे पुढे येण्याची शक्यता आहे. त्यामुळे १ लाख १८ हजार रुपये कशासाठी काढले गेले, याचा अद्यापही छडा लागलेला नाही.