पाकिस्तानविरुद्धच्या तीन सामन्यांच्या मलिकेत २-० अशी आघाडी घेत दक्षिण आफ्रिकेने आयसीसी कसोटी ‘चॅँपियनशिप मेस’ आपल्याकडेच ठेवली आहे.
दुबई- केपटाउनमध्ये दुसरी कसोटी जिंकत पाकिस्तानविरुद्धच्या तीन सामन्यांच्या मलिकेत २-० अशी आघाडी घेत दक्षिण आफ्रिकेने आयसीसी कसोटी ‘चॅँपियनशिप मेस’ आपल्याकडेच ठेवली आहे.
वर्षातील सर्वोत्तम कसोटी संघ ठरवण्यासाठीची अंतिम मुदत एक एप्रिल आहे. पाकिस्तानविरुद्धच्या मालिका विजयानंतर दक्षिण आफ्रिकाच अव्वल स्थानी राहणार, हे निश्चित आहे. भारत-ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड-न्यूझीलंड यांच्यातील आगामी कसोटी मालिकेत कोणताही निकाल लागला तरी त्यांच्या अव्वल स्थानाला धोका नाही. कसोटी ‘मेस’ कायम ठेवतानाच चार लाख ५० हजार डॉलर्सचे बक्षिसही दक्षिण आफ्रिकेने निश्चित केले.
विशेष म्हणजे ‘मेस’ राखण्यासाठी द. आफ्रिकेला पाकिस्तानविरुद्ध सुरू असलेली कसोटी मालिका बरोबरीत सोडवणेही पुरेसे होते. मात्र लागोपाठ दोन्ही सामने जिंकत तिस-या कसोटीपूर्वीच पाकिस्तानने मालिकेवर नाव कोरले. सध्या द. आफ्रिकेच्या खात्यात १२४ रेटिंग गुण आहेत. तिसरी कसोटी जिंकली तर रेटिंग गुण १२५ होतील.
यजमानांचा सलग सहावा मालिका विजय
केपटाउन- पाकिस्तानविरुद्धची दुसरी कसोटी चौथ्याच दिवशी रविवारी चार विकेट्सनी जिंकत दक्षिण आफ्रिकेने सलग सहावा कसोटी मालिका विजय मिळवला. त्यात मायदेशात आणि परदेशातील प्रत्येकी तीन मालिकांचा समावेश आहे. यजमानांचा हा सलग पाचवा कसोटी विजय आहे. विजयासाठी १८२ धावांचे आव्हान गाठताना सईद अजमलच्या फिरकीपुढे यजमानांनी सहा विकेट्स गमावल्या तरी सध्या कसोटी क्रमवारीत अव्वल रॅँकिंगवर असणाऱ्या हाशिम अमलाने (५८) झळकवत द. आफ्रिकेला आरामात विजय मिळवून दिली. उभय संघांमधील तिसरी आणि अंतिम कसोटी शुक्रवारपासून (२२ फेब्रुवारी) सेंच्युरियनमध्ये रंगेल.
स्मिथ सर्वात यशस्वी कर्णधार
पाकिस्तानवरील सलग दुस-या विजयानंतर दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार ग्रॅमी स्मिथच्या नावे नवा विक्रम नोंदला गेला आहे. स्मिथने त्याच्या कर्णधारपदाच्या यशस्वी कारकीर्दीत सर्वाधिक कसोटी विजय नोंदवले. स्मिथच्या नेतृत्वाखालील १०१ कसोटींमध्ये ४९ विजय मिळवण्यात दक्षिण आफ्रिकेला यश आल आहे. त्याने ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पॉँटिंगला (७७ कसोटींत ४८ विजय) मागे टाकले.