केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी सादर केलेले तेलंगणा विधेयक लोकसभेत मंजूर करण्यात आले.
नवी दिल्ली- केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी सादर केलेले तेलंगणा विधेयक लोकसभेत मंगळवारी मंजूर करण्यात आले. यावेळी तृणमूल काँग्रेस आणि जेडीयूच्या सदस्यांनी मतदानावेळी सभात्याग केला. मतदानाआधी शिंदे यांनी सीमांध्रसाठी विशेष पॅकेजची घोषणा केली.
लोकसभा कामकाजाचे थेट प्रसारण बंद
तेलंगण विधेयकाच्या मंजुरीच्या वेळी लोकसभेत गदारोळ सुरू असताना या कामकाजाचे थेट प्रक्षेपण बंद ठेवण्यात आले. तेलंगणच्या निर्मितीचा निर्णय जाहीर झाल्यानंतर हैदराबादमध्ये तेलंगण समर्थकांनी जल्लोष केला. तर सीमांध्र भागात त्या विरोधात निदर्शने झाली. त्याच वेळी वायएसआर काँग्रेसचे नेते जगनमोहन रेड्डी यांनी देशासाठी हा काळा दिवस असल्याची प्रतिक्रिया व्यक्त करत बुधवारी आंध्र प्रदेश बंद करण्याची हाक दिली. या निर्णयाला विरोध करणारे आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री किरण कुमार रेड्डी बुधवारी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा देण्याची शक्यता आहे.
त्याआधी लोकसभेत सुरु असलेल्या प्रचंड गोंधळात केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी तेलंगण विधेयक सादर केले. विधेयक सादर करण्यापूर्वी संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारने मुख्य विरोधी पक्ष असलेल्या भाजपशी चर्चा केली होती. सीमांध्रसाठी विशेष पॅकेजची भाजपची मागणी केंद्र सरकारने मान्य केली होती. तसेच लोकसभेतील चर्चेनंतर सुधारित विधेयक संसदेत आणले जाईल अशी ग्वाही देखील सरकारने दिली आहे. त्यामुळे तेलंगण विधेयकाला भाजपने सशर्त पाठिंबा दर्शविला होता.
शिंदे यांनी संसदेत तेलंगण विधेयक सादर करताच विरोधकांनी मोठ्या प्रमाणावर गोंधळ केला. त्यामुळे लोकसभेचे कामकाज तीन वेळा स्थगित करावे लागले. लोकसभेचे कामकाज तीन वाजेपर्यंत तहकूब करण्यात आले होते. तर राज्यसभेचे कामकाज दुपारी दोन वाजेपर्यंत तहकूब करण्यात आले आहे.
संसदेच्या मध्यवर्ती सभागृहात काही खासदार आक्षेपार्ह वस्तुंसह सापडल्याचे वृत्त आहे. संबंधित खासदार कोणत्या पक्षाचे आहेत, हे अद्याप समजू शकलेले नाही. या पार्श्वभूमीवर सुरक्षा यंत्रणा संशयित वस्तुचा कसून शोध घेत आहेत.
बहुजन समाजवादी पक्षाच्या अध्यक्ष मायावती यांनी तेलंगण विधेयकाला पाठिंबा दर्शविला आहे. उत्तर प्रदेशाचेही विभाजन व्हायला हवे. चार वेगवेगळी राज्ये झाली पाहिजेत. तसेच महाराष्ट्रापासून विदर्भही वेगळा झाला पाहिजे, असे वक्तव्य करुन मायावती यांनी नव्या वादाला तोंड फोडले आहे.
[EPSB]
आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री रेड्डी राजीनामा देणार
केंद्र सरकारने मंगळवारी तेलंगण विधेयक लोकसभेत सादर केल्याने रेड्डी राजीनामा देण्याची शक्यता आहे.
[/EPSB]