पोस्टातील बचतींवरील व्याज दरात करण्यात आलेल्या कपातीचा नियोजन आयोगाचे उपाध्यक्ष माँटेकसिंग अहलुवालिया यांनी समर्थन केले आहे.
नवी दिल्ली- पोस्टातील बचतींवरील व्याज दरात करण्यात आलेल्या कपातीचा नियोजन आयोगाचे उपाध्यक्ष माँटेकसिंग अहलुवालिया यांनी समर्थन केले आहे.
सार्वजनिक भविष्यनिर्वाह निधी तसेच इतर पोस्टातील इतर छोटया बचतींवरील व्याज दर एप्रिलपासून ०.१० टक्क्याने कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र या कपातीनंतरही पोस्टातील बचतीवरील परतावा हा चांगलाच असल्याचे अहलुवालिया यांनी म्हटले आहे.
गेल्या दोन वर्षाआधीची आकडेवारी पाहिल्यास महागाईचा दर खूपच खाली आलेला आहे. त्या तुलनेत पोस्टातील बचतीवरील व्याज दर हे समर्थनीय असल्याचे अहलुवालिया यांनी सांगितले. देशातील व्याज दर प्रणालीतून पोस्टातील बचतीवर मिळणारे व्याज दर पूर्णपणे वेगळे केले जातील, असे आपल्याला अजिबात वाटत नसल्याचेही ते म्हणाले.
२०१३-१४ या आर्थिक वर्षासाठी पीपीएफवर सुधारित दरानुसार ८.७ टक्के व्याज मिळणार आहे. तर नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेटवर पाच आणि १० वर्षासाठी अनुक्रमे ८.५ टक्के आणि ८.८ टक्के व्याज मिळेल. श्यामला गोपीनाथ समितीच्या शिफारशींनुसार ही कपात केली आहे. पोस्टातील दर बाजारातील दराशी सुसंगत करण्याची या समितीने शिफारस केली आहे.
कर्जासाठी कमी व्याज दर हवे असतील तर मग बचतीवर अधिक व्याज दराची अपेक्षा धरणे चुकीचे ठरेल असेही अहलुवालिया यांनी सांगितले.