कर्जत तालुक्यात सर्व शिक्षा अभियानातून मंजूर झालेली एक वर्गखोली पूर्ण होण्यास चार वर्षाचा कालावधी लोटला आहे. या वर्गाचे बांधकाम करण्यासाठी ४.३७ लाखांची तरतूद असून आणि आतापर्यंत ४.१५ बीलही देण्यात आले आहे.
नेरळ – कर्जत तालुक्यात सर्व शिक्षा अभियानातून मंजूर झालेली एक वर्गखोली पूर्ण होण्यास चार वर्षाचा कालावधी लोटला आहे. या वर्गाचे बांधकाम करण्यासाठी ४.३७ लाखांची तरतूद असून आणि आतापर्यंत ४.१५ बीलही देण्यात आले आहे. मात्र धक्कादायक बाब म्हणजे इतके बील घेऊनही ठेकेदाराने वाटांचे बांधकामही पूर्ण केलेले नाही. त्यामुळे या संपूर्ण कामाची चौकशी करण्याची मागणी आमदार सुरेश लाड यांनी जिल्हा परिषदेकडे केली आहे.
पोटल ग्रामपंचायतचे सदस्य बजरंग श्रीखंडे यांनी पोटल शाळेच्या इमारतीचा विषय लावून धरला आहे. २०११-१२ या आíथक वर्षात पोटलच्या जिल्हा परिषद शाळेसाठी एक वर्ग खोली सर्व शिक्षा अभियानातून मंजूर करण्यात आली होती. हा निधी जिल्हा स्तरावरून थेट शाळेच्या नावे जमा होतो.
बांधकामाच्या प्रगतीनुसार त्यातून बील देण्याची शिफारस कर्जत पंचायत समितीच्या शाखा अभियंत्यांकडून केल्यानंतर मुख्याध्यापक ठेकेदराला पैसे देतात. या वर्गाचे काम मंजूर झाल्यानंतर ठेकेदाराने कामाला सुरुवात केली, मात्र पुढे त्याने शाळेचे मुख्याध्यापकांशी सलगी करत बांधकाम सुरू असल्याचे दाखवून पैसे लाटण्यास सुरुवात केली. यामुळे शासनदरबारी बांधकाम सुरू असल्याचे दिसत असले, तरी विद्यार्थ्यांवर मात्र त्याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे. या शाळेचे मुख्याध्यापक बहिराम यांनी सर्व शिक्षा अभियानचे अभियंता आणि कर्जत पंचायत समितीचे गटशिक्षण अधिकारी यांच्या मदतीने शाळेच्या इमारतीचे केवळ ३० टक्के काम झाले असतानाही ९० टक्के बील दिल्याने यात मुख्याध्यापकांचे हातही ओले झाल्याचा आरोप होत आहे. ग्रामपंचायत सदस्य बजरंग श्रीखंडे यांनी या प्रकाराला वाचा फोडल्याने हा विषय समोर आला असून त्याची गंभीर दखल घेत कर्जतचे आमदार सुरेश लाड यांनी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिका-यांना याचा तपास करण्याची मागणी केली आहे.