पेड न्यूज प्रकरणी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्यावर निवडणूक आयोगाने शुक्रवारी पाच आरोप निश्चित केले आहेत.
नवी दिल्ली -पेड न्यूज प्रकरणी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्यावर निवडणूक आयोगाने शुक्रवारी पाच आरोप निश्चित केले आहेत. या आरोपांवर नऊ जून ते १३ जून दरम्यान युक्तिवाद होणार आहे. दररोज एका आरोपावर युक्तिवाद केला जाणार आहे.
याआधी पाच मे रोजी सर्वोच्च न्यायलायने चव्हाणांची याचिका फेटाळून लावत आयोगाला या प्रकरणी चौकशी करण्याचे पूर्ण अधिकार असल्याचे म्हटले होते. तसेच ४५ दिवसांच्या आत चौकशी करावी असे आदेशही दिले होते. त्यानंतर शुक्रवारी आयोगाने चव्हाण यांच्याविरोधात पाच आरोप निश्चित केले.
२००९ ची विधानसभा निवडणूक लढवणा-या अशोक चव्हाणांसाठी वर्तमानपत्रातून जाहीराती देण्यात आल्या होत्या. या निवडणूक खर्चावर त्यांच्या भोकर मतदारसंघातील प्रतिस्पर्धी उमेदवार डॉ. माधव किन्हाळकर यांनी आक्षेप घेत निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली होती.
सोळाव्या लोकसभा निवडणुकीत अशोक चव्हाण यांना नांदेड लोकसभा मतदारसंघातून विजय मिळाला होता. राज्यातून काँग्रेसचे केवळ दोन खासदार निवडून आले होते. त्यापैकी एक अशोक चव्हाण आहेत.