पेड न्यूज प्रकरणी दिल्ली उच्च न्यायालयाने महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांना नोटिस बजावली आहे.
नवी दिल्ली – महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण पुन्हा एकदा अडचणीत सापडले आहेत. पेड न्यूज प्रकरणी दिल्ली उच्च न्यायालयाने त्यांना नोटिस बजावली आहे. न्यायालयाने येत्या ३१ ऑक्टोबरपर्यंत या नोटिशीवर उत्तर देण्याचे आदेश चव्हाण यांना दिले आहेत.
१२ सप्टेंबर रोजी झालेल्या सुनावणीदरम्यान केंद्रीय निवडणूक आयोगाने चव्हाण यांना बजावलेली कारणे दाखवा नोटीस उच्च न्यायालयाने रद्द केली होती. निवडणूक आयोगाने बजावलेली ही नोटीस चुकीची असल्याचे सांगत उच्च न्यायालयाचे न्यायमुर्ती सुरेश कैत यांनी ही नोटीस रद्द केली होती.
न्यायमूर्तींच्या या निर्णयाविरोधात अपक्ष उमेदवार माधव किन्हाळकर यांनी पुन्हा याचिका दाखल केली होती. यावर न्यायालयाने चव्हाण यांना नोटीस बजावली आहे. तसेच निवडणूक आयोगाला अशा प्रकारची नोटिस पाठवण्याचा अधिकार असल्याचा निर्वाळाही न्यायालयाने यावेळी दिला.
२००९ ची विधानसभा निवडणूक लढवणा-या अशोक चव्हाणांसाठी वर्तमानपत्रातून जाहीराती देण्यात आल्या होत्या. या निवडणूक खर्चावर त्यांच्या भोकर मतदारसंघातील प्रतिस्पर्धी उमेदवार डॉ. माधव किन्हाळकर यांनी आक्षेप घेत निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली होती.