प्राप्तिकर खात्यातर्फे देण्यात येणा-या परमनंट अकाऊंट नंबरसाठी (पॅन) केवळ आधार कार्ड आणि निवडणूक ओळखपत्राचा पुरावा आता पुरेसा ठरणार आहे.
नवी दिल्ली- प्राप्तिकर खात्यातर्फे देण्यात येणा-या परमनंट अकाऊंट नंबरसाठी (पॅन) केवळ आधार कार्ड आणि निवडणूक ओळखपत्राचा पुरावा आता पुरेसा ठरणार आहे. सध्या पॅनकार्डसाठी स्वत:ची ओळख पटवण्यासाठी ओळखपत्रासह विविध कागदपत्रे मागितली जातात.
केंद्रीय प्रत्यक्ष कर विभागाने नुकतीच याबाबतची अधिसूचना जारी केली आहे. पॅनकार्ड काढण्यासाठी व्यक्तीला ओळख पटवण्यासाठी पत्त्याचा पुरावा व छायाचित्र ओळखपत्र म्हणून द्यावे लागते. त्यासाठी ढिगभर पुरावे जोडावे लागतात. ते शोधताना संबंधितांच्या नाकीनऊ येतात. आता आधार कार्ड व निवडणूक ओळखपत्र दिल्यास अन्य कोणतेही पुरावे देण्याची गरज उरणार नाही.
आधार क्रमांकावरील जन्मदिनांक, पत्ता व छायाचित्र हे पॅनकार्डसाठी पुरेसे असेल. ही दोन्ही ओळखपत्रे सर्व कामांसाठी सर्वत्र वापरली जातात, असे प्राप्तिकर विभागाच्या वरिष्ठ अधिका-याने सांगितले.
सध्या जन्मतारखेची ओळख पटवण्यासाठी १२ कागदपत्रांचा वापर केला जातो. सर्वसामान्य व्यक्तीचा त्रास वाचवण्यासाठी कमीत कमी कागदपत्रे वापरण्याचे धोरण सरकारने आखले आहे.