पूर्ती उद्योग समूह गैरव्यवहार प्रकरणी राज्यसभेत काँग्रेससह विरोधकांनी नितीन गडकरी यांच्या राजीनाम्याची मागणी केली.
नवी दिल्ली- पूर्ती उद्योग समूह गैरव्यवहार प्रकरणी कॅगच्या अहवालावरुन राज्यसभेत काँग्रेससह विरोधकांनी सोमवारी नितीन गडकरी यांच्या राजीनाम्याची मागणी केली. तसेच गडकरींविरोधात घोषणाबाजी केली. यामुळे राज्यसभेचे कामकाज १० मिनीटांसाठी तहकूब करावे लागले.
कॅगच्या अहवालात गडकरींच्या पूर्ती उद्योगसमूहाने सबसिडी मिळवताना काही नियमांचे उल्लंघन केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. पूर्ती संदर्भात कॅगने दिलेल्या अहवालावर राज्यसभेत चर्चा घेण्याची काँग्रेसने मागणी केली आहे. राज्यसभेत काँग्रेसचे खासदार प्रमोद तिवारी यांनी चर्चेसाठी नोटीस दिली आहे.
विरोधकांनी राज्यसभेत मुद्दा उपस्थित केल्यावर गडकरी यांनी राज्यसभेत स्पष्टीकरण दिले. पूर्तीवरील आरोप राजकीय हेतूने प्रेरीत आहेत. पूर्तीचे ऑडिट झालेले आहे. काही दोष असतील तर कायदेशीर कारवाई करावी, असे स्पष्टीकरण त्यांनी दिले.
दरम्यान, राज्यसभेत जीएसटी विधेयक मंजूर करुन घेण्यासाठी भाजपा सरकारचे शर्थीचे प्रयत्न चालू आहेत. मात्र गडकरींच्या मुद्द्यावरुन काँग्रेसने मागिल तीन दिवसांपासून भाजपा सरकारला कोंडीत पकडले आहे. जीएसटी विधेयक मंजूर करुन हवे असेल तर आधी गडकरींचा राजीनामा घ्या, अशी भूमिका काँग्रेसने घेतली आहे.
जीएसटी विधेयक मंजूर होण्यासाठी घटना दुरुस्तीची आवश्यकता आहे. त्यामुळे राज्यसभेत दोन तृतीयांश बहुमताची गरज आहे. सरकारची ही अडचण ओळखून काँग्रेसने गडकरींच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली आहे.