कुडाळ तालुक्यातील ज्या गावात पावसाळ्यात पूरपरिस्थिती ओढवते, अशा सर्व गावांत सतर्कता बाळगून कुडाळ तहसील कार्यालयामार्फत आपत्कालीन आराखडा तयार करण्यात आला आहे.
कुडाळ – कुडाळ तालुक्यातील ज्या गावात पावसाळ्यात पूरपरिस्थिती ओढवते, अशा सर्व गावांत सतर्कता बाळगून कुडाळ तहसील कार्यालयामार्फत आपत्कालीन आराखडा तयार करण्यात आला आहे. या पूरस्थिती ओढवणा-या गावांसाठी आपत्ती व्यवस्थापन समिती स्थापन करण्यात आली असून या गावांसाठी फायबर बोटी, टॉर्च, लाइफबॉय रिंग, दोरखंड, लाईफ जॅकेट आदी साहित्य उपलब्ध करण्यात आले आहेत. जेणेकरून अद्ययावत असा आपत्कालीन आराखडा तयार करून येणा-या पावसाळय़ात पूरपरिस्थितीवर नियंत्रण केले जाणार आहे.
कुडाळ तालुक्यात दरवर्षी अतिवृष्टीमुळे चेंदवण, पावशी, सरंबळ, बांव, कुडाळ, आंबेडकरनगर आदी भागात पूरपरिस्थिती निर्माण होते. यासाठी येथील नागरिकांना इतर ठिकाणी स्थलांतरित करण्यात येते. याबाबत महसूल विभागाकडून आपत्कालीन स्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी १३ सदस्यांची आपत्ती व्यवस्थापन समिती स्थापन करण्यात आली असून या समितीच्या प्रमुखपदी तहसीलदार जयराज देशमुख यांच्याकडे जबाबदारी सोपवण्यात आली आहे. या आपत्कालीन समितीमध्ये मंडल अधिकारी, तलाठी, सरपंच, पोलिस पाटील व कृषी सहाय्यक यांच्याकडे जबाबदारी वाटून देण्यात येते. तालुक्यातील पूरस्थिती ओढवणा-या भागाची लोकसंख्या १ लाख ५२ हजार ९३९ एवढी असून त्यातील ३३ हजार २०९ कुटुंबे त्यामध्ये समाविष्ट आहेत. कुडाळ तालुक्यातील कुडाळ आंबेडकरनगर १४, पावशी शेलटेवाडी २६, बाव बागवाडी १०, चेंदवण मळावाडी १३८, सरंबळ नाईकवाडी २५, अशी एकूण २०७ कुटुंबे अतिपूरबाधित क्षेत्रात येतात या ठिकाणच्या नागरिकांना आपत्कालीन व्यवस्थेसाठी ३ फायबर बोटी, रिंग व टॉर्च ७, दोरखंड व लाईफ जॅकेट ५० अशा साहित्याची उपलब्धता केली आहे. या ठिकाणी येणा-या पूरस्थितीच्या वेळी नागरिकांना तेथील माध्यमिक, प्राथमिक शाळा, ग्रामपंचायत कार्यालय, समाजमंदिर, अंगणवाडी आदी ठिकाणी स्थलांतरीत करण्याबाबतचे नियोजनही या आराखडय़ाद्वारे करण्यात आले आहे.
तालुक्यात आपत्कालीन परिस्थिती ओढवल्यास पूरग्रस्तांना वाचवण्यासाठी व त्याचे पुनर्वसन करण्यासाठी १८४ तज्ज्ञ पोहणा-याचे पथक, पाच क्रेनधारक, ३७ जेसीबी, पूरग्रस्तांना पूरबाधित क्षेत्रातून बाहेर काढण्यासाठी २० खासगी होडय़ा, १३४ खाजगी वाहने, पाच रुग्णवाहिका, तर ५६ खासगी डॉक्टरांकरवी आरोग्य सुविधाही पुरवण्याची योजना या आपत्कालीन आराखडय़ात तयार केली आहे.
तसेच पूरबाधीत क्षेत्रातील गुरांसाठी एका पशुवैद्यकीय दवाखान्यासह तर तालुक्यातील पाच आरोग्य केंद्रातील आपत्कालीन साधनांचा वापर या आराखडय़ाद्वारे पूरबाधित नागरिकांसाठी करण्यात येणार आहे. याबाबत आपत्ती व्यवस्थापनाची बैठक सोमवार, १९ मे रोजी कुडाळ तहसीलदार कार्यालयात आयोजित करण्यात आली आहे. यामुळे पावसाळ्यात तालुक्यात निर्माण होणा-या पूरस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी कुडाळ तहसीलदार कार्यालयातर्फे आपत्कालीन आराखडा तयार करण्यात आला असून त्याबाबतचे मार्गदर्शन संबंधित अधिका-यांना दिले जाणार आहे.