एखादा पौराणिक किंवा ऐतिहासिक कार्यक्रम पाहताना त्यातल्या राण्या-महाराण्याच नाही तर राजे-महाराजेसुद्धा डोक्यापासून ते पायापर्यंत अलंकाराने नटलेले दिसतात. त्यांनी केलेला हा अलंकाराचा साज आताच्या तरुण किंवा पुरुष वर्गाला करायला सांगितला तर? पूर्वी पुरुषवर्ग सुद्धा स्त्रियांसारखे अलंकार अंगावर मिरवायचे; पण हल्ली तसं चित्र दिसत नाही. त्यामुळे आभूषणांपासून कित्येक वर्षे दूर राहिलेल्या या पुरुषवर्गाला पुन्हा एकदा आभूषणांकडे वळवण्याचा ट्रेंड सुरू झालाय.
आभूषणे हे सौंदर्याचं लक्षण आहे. स्त्री असो वा पुरुष दागिन्यांचे आकर्षण प्रत्येकालाच असतं, त्यातून महिला वर्गाला हे आकर्षण अधिक असतं. त्यामुळे आतापर्यंत दागिन्यांच्या दुकानात तुम्ही गेलात तर पुरुषांपेक्षा माहिलांच्या दागिन्यांनी भरलेली दुकानं तुम्हाला दिसतील. पुरुषांचे दागिने फक्त गळ्यातील चेन, ब्रेसलेट आणि अंगठी या तीन प्रकारांपुरताच मर्यादित राहिले.
जर आपण पौराणिक किंवा ऐतिहासिक कार्यक्रमातील एखाद्या देवाची किंवा राजा-महाराजांची वेशभूषा पाहिली तर नखशिखांत दागिन्यानं नटलेलं त्यांचं रूप दिसेल. जुन्या राजा-महाराजांच्या फोटोत देखील तुम्हाला त्यांच्या अंगावर अगदी भरभरून दागिने पाहायला मिळतील. इतकंच कशाला अगदी आपल्या प्राचीन संस्कृतीमध्ये सुद्धा दागिने हा पुरुषांच्या श्रृगांराचा अविभाज्य भाग होता. हा काळ हळूहळू मागे पडला,
इतका मागे की पुरुष आणि अलंकार हे समीकरण जमेनासं झालं. काळाबरोबर पदरी हार, कंठी, बाजूबंध, तोडा, कंबरपट्टा, तुरा, मोत्यांची माळ, कर्णभूषणं यासारखे पुरुषी अलंकार विस्मृतीत गेले.
याच अलंकारांना पुन्हा आणण्याची धडपड सध्या सुरू आहे. दागिन्यांबाबत पुरुषवर्गाचं मन थोडय़ाफार प्रमाणात का होईना वळवण्याचे प्रयत्न ज्वेलरी डिझायनर्सकडून होताना दिसत आहे. लग्न समारंभात वा सांस्कृतिक कार्यक्रमात या दागिन्यांची क्रेझ पुन्हा एकदा नव्याने जन्म घेत आहे. अगदी सगळेच नाही; पण सरपेच, हार, तुरा, माळ यासारख्या पण काही पारंपरिक पुरुषी दागिन्यांना आधुनिकतेची जोड देऊन ते वापरण्याबाबत पुरुषवर्गाचं मन वळवताना दिसून येत आहे.
सरपेच किंवा तुरा हा राजा-महाराजांच्या मुकुटावरील मानाचा समजाला जाणारा अलंकार होता. किमती रत्नं आणि खडे यांपासून हे सरपेच बनवले जायचे. हल्ली या सरपेचांनी आभूषणांच्या मार्केटमध्ये एण्ट्री केली आहे. पण मुकुटावरली सरपेचांचं स्थान आधुनिक काळात फेटय़ावर दिसतं. लग्नात फेटे, पगडी घालण्याची पद्धत आहे.
त्यामुळे या फेटय़ावर किंवा पगडीवर लावायला हे सरपेच मिळतात. काही फेटय़ांच्या दुकानांत हे सरपेच फेटा किंवा पगडीला लावलेलेच असतात. हे सरपेच हल्ली दुकानात बनवून देखील मिळतात. काही सरपेच हे पारंपरिक प्रकारात मिळतात. नव्या ज्वेलरी डिझायनर्सनं यात थोडा बदल करून आधुनिक रूप दिलेले सरपेच देखील पुरुषवर्गाच्या पसंतीस उतरत आहेत.
दुसरा अलंकार म्हणजे ब्रोच. कोटला लावल्या जाणा-या या दागिन्याला भारतीय पद्धतीचा टच देण्यात आला आहे. हे ब्रोच खास शेरवानी, सफारीसारख्या कपडय़ासांठी डिझाईन करण्यात आलेले आहे. हे ब्रोच बनवण्यासाठी हिरे, मोती, कुंदन याचा वापर केला आहे. खास हाराला असणारे पदर देखील या ब्रोचना जोडण्यात आले आहेत त्यामुळे तुम्ही कोणत्याही पद्धतीनं हे ब्रोच शेरवानी किंवा कुडत्यावर लावू शकतात. या ब्रोचमुळे साधारण शेरवानीलासुद्धा ग्लॅमर प्राप्त होतं. हल्ली ब-याच शेरवानीच्या दुकानात हे ब्रोच त्या कपडय़ाला जोडलेच असतात. पण तुम्ही क्रॉस कॉलर शेरवानी निवडत असाल तर त्यावर हे पदर असलेले ब्रोच छान दिसतात.
तिसरा महत्त्वाचा अलंकार म्हणजे हार, माळ. बघायला गेलं तर एखाद्या कार्यक्रमात पुरुषांनी मोत्याचा, हि-यांचा हार किंवा माळ वापरलेलं दृश्य बघायला मिळणं दुर्मीळच, कारण तो काळ गेला. त्यामुळे हल्ली पुरुषवर्ग लग्नात या आभूषणाव्यतिरिक्त सोनं किंवा फार फार तर प्लॅटिनमची चेन घालताना दिसतात. पण तुम्हाला यापेक्षा काही वेगळं हवं असेल तर मोत्यांचे किंवा खडय़ांचे हार एकदा वापरून बघायलाच पाहिजे.
गळ्याभोवती असणा-या हारापासून ते पोटापर्यंत लोंबकळणा-या हारापर्यंत अनेक नव्या डिजाईन बाजारात उपलब्ध आहेत. हे हार मोत्यांमध्ये उपलब्ध आहेत. मोत्यांचे हार हे कोणत्याही रंगांच्या कपडय़ांवर सहज उठून दिसतात. हल्ली रंगीबेरंगी मोत्यांचे हार देखील बाजारात उपलब्ध आहेत. त्यामुळे पुरुष मंडळींना निवडायला विविध पर्याय आहेत. संपूर्ण बंद गळ्याच्या प्लेन शेरवानीवर हे हार घातले तर त्याच्या सौंदर्यात अधिक भर पडते.