खुनाच्या खटल्यातील साक्षीदारावर दबाव आणण्याच्या उद्देशाने पुण्यातील दांडेकर पुलाजवळ बुधवारी रात्री दोन गटात तुफान हाणामारी झाली.
पुणे- खुनाच्या खटल्यातील साक्षीदारावर दबाव आणण्याच्या उद्देशाने पुण्यातील दांडेकर पुलाजवळ बुधवारी रात्री दोन गटात तुफान हाणामारी झाली. यावेळी करण्यात आलेल्या दगडफेकीत काही दुचाकी आणि टेम्पोचेही नुकसान झाले असून, एका इमारतीतील घराच्या काचाही फोडण्यात आल्या. याप्रकरणी दत्तवाडी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणी दत्तवाडी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक संगमनाथ परगेवार (३४) यांनी फिर्याद दिली आहे. दगडफेक करताना रोहन ओव्हाळ यास रंगेहाथ पकडण्यात आले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गणेश कांबळे याच्या खुनाच्या खटल्यामध्ये साक्षीदार असलेल्यावर दबाव यावा, यासाठी खुनातील आरोपी अमोल काळे, मुकुंद गायकवाड, शंकर भालेराव व त्यांचे तीन ते चार साथीदार यांनी दांडेकर पुलाजवळील स. न. १३२ मध्ये दगडफेक करून दहशत माजवली.
त्यास प्रत्युत्तर देण्यासाठी बबलू भालशंकर, अजय माने, भरत माने, सचिन धोत्रे, रॉकी सुतार, रोहित कांबळे, रोहन ओव्हाळ व त्यांचे आणखी दोन-तीन साथीदारांनी लक्ष्मी-नारायण टॉवर येथे जाऊन पाìकगमधील टेम्पो, मोटारसायकल यांच्यावर दगडफेक केली. तसेच फ्लॅटच्या काचाही फोडल्या. या घटनेमुळे परिसरामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते