मध्य प्रदेशातील खांडवा तुरुंगातून २०१३ मध्ये फरार झालेल्या ‘सिमी’च्या सहापैकी चार दहशतवाद्यांना बुधवारी ओदिशात अटक केली.
पुणे/भुवनेश्वर – मध्य प्रदेशातील खांडवा तुरुंगातून २०१३ मध्ये फरार झालेल्या ‘सिमी’च्या सहापैकी चार दहशतवाद्यांना बुधवारी ओदिशात अटक केली. पुण्यातील फरासखाना पोलीस ठाण्यात झालेल्या बॉम्बस्फोटात त्यांचा हात होता, अशी माहिती राज्य गुप्तचर विभागाचे विशेष पोलीस महासंचालक अरुण सारंगी यांनी दिली.
ओदिशा व तेलंगण पोलिसांनी संयुक्त मोहिमेत या चार दहशतवाद्यांना जेरबंद केले. यापूर्वी या दहशतवाद्यांनी पोलिसांवर जोरदार गोळीबार केला. त्याला पोलिसांनी चोख प्रत्युत्तर दिले. हे सिमीचे चारही दहशतवादी एनआयए आणि अनेक राज्यांना हवे होते, अशी माहिती ओदिशाचे पोलीस महासंचालक के. बी. सिंग यांनी दिली.
मोहम्मद ऐजाजुद्दीन, अमजद खान, झाकीर हुसैन व मेहबूब लड्ड अशी दहशतवाद्यांची नावे आहेत. सात राज्यांकडून या दहशतवाद्यांचा शोध सुरू होता. या दहशतवाद्यांनी देशाच्या विविध भागात अनेक दहशतवादी कारवाया केल्या होत्या.