या आठवडय़ाच्या पहिल्या दिवसापासून शेअर बाजारात तेजीचे वातावरण कायम राहिले. आठवडय़ाच्या पहिल्या दोन सत्रात निर्देशांकात मर्यादित वाढ झाली. गुरुवारच्या सत्रात मात्र निर्देशांकानी जोरदार उसळी घेतली. शुक्रवारच्या सत्रात निर्देशांक निफ्टीने मागील उच्चांक १०१७९ मोडत नवीन उच्चांक नोंदविला. त्यानंतर मात्र निर्देशांक निफ्टीमध्ये नवीन उच्चांकापासून थोडी घसरण झाली. निर्देशांक सेन्सेक्स ३१७६९ आणि निफ्टीची ९९५६ ही या आठवडय़ाची नीच्चांकी पातळी होती. पुढील आठवडय़ात दिवाळीमुळे कमी दिवस कामकाज होणार आहे.
कोणत्याही चांगल्या कामाची सुरुवात करीत असताना आपण चांगला दिवस किंवा चांगला मुहूर्त बघत असतो. ‘लक्ष्मीपूजन’ हा अत्यंत शुभ दिवस भारतीय शेअर बाजारात मुहूर्ताचा समजला जातो. या दिवशी होणा-या कामकाजाला ‘मुहूर्त ट्रेडिंग’ असे म्हणतात. यंदा देखील दरवर्षीप्रमाणे ‘मुहूर्त ट्रेडिंग’ होणार आहे.
‘लक्ष्मीपूजन’ या दिवशी होणारे मुहूर्त ट्रेडिंग पुढील आठवडय़ात गुरुवारी दिनांक १९ ऑक्टोबर २०१७ ला होणार आहे. संध्याकाळी ६.३० ते ७.३० या वेळेत मुहूर्त ट्रेडिंग होईल. त्यापूर्वी ६.१५ ते ६.३० प्री ओपनिंग सेशन असेल. या दिवशी नवीन सुरुवात करीत असलेल्या गुंतवणूकदारांना मध्यम तसेच दीर्घमुदतीसाठी गुंतवणूक करून शेअर बाजारातील गुंतवणुकीचा शुभारंभ करता येईल.
मुहूर्ताची खरेदी करीत असताना दीर्घमुदतीसाठी विविध क्षेत्रातील अनेक दिग्गज कंपन्यांचे पर्याय आज उपलब्ध आहेत. त्यामध्ये फार्मा क्षेत्रातील ‘सनफार्मा’, आय.टी क्षेत्रातील ‘एचसीएल टेक्नोलॉजी’, फायनान्स क्षेत्रात ‘एलआयसी हौसिंग फायनान्स’, ऑटो क्षेत्रात ‘मारुती सुझुकी’ यासारख्या कंपन्यांचा विचार करता येईल.
या आठवडय़ापासून कंपन्यांचे तिमाही निकाल येण्यास सुरुवात झालेली आहे. त्यामध्ये खासगी बँकिंग क्षेत्रातील ‘इंडसेंड बँक’ने आपला तिमाही निकाल जाहीर केला. त्यांचा निव्वळ नफा या तिमाहीत ८८० करोड रुपये इतका राहिला. मालमत्तेच्या गुणवत्तेच्या बाबतीत सांगायचे झाल्यास निव्वळ एन.पी.ए आधीच्या तिमाहीच्या तुलनेत ५०८ कोटी रुपयांवरून ५३७ कोटी रुपयांवर आला. या निकालानंतर या बँकेच्या शेअर्समध्ये १ टक्क्य़ाने वाढ झाली.
आयटी क्षेत्रातील दिग्गज कंपनी ‘टीसीएस’ने आपला दुस-या तिमाहीतील निकाल जाहीर केला. त्यांच्या नफ्यामध्ये तब्बल ८.४० टक्क्यांची वाढ होत तो ६४४६ करोड रुपयांवर पोहोचला. तिमाही कालावधीत एकत्रित महसूल आणि डॉलरच्या महसुलात ३.२ टक्क्यांनी वाढ झाली. या निकालाच्या वेळी कंपनीने शेअर्स गुंतवणूकदारांना प्रती शेअर ७ रुपये इतका लाभांश जाहीर केला. पुढील आठवडय़ात डी मार्ट, बजाज फायनान्स, कॅनफिन होम्स, अॅक्सिस बँक, क्रिसिल या कंपन्या आपला तिमाही निकाल जाहीर करतील.
गुरुवारच्या सत्रात निर्देशांकात झालेल्या वाढीमध्ये ‘रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड’ या शेअरमध्ये जवळपास ४ टक्क्यांची वाढ झाली. शेअर बाजारात कोणत्याही कंपनीच्या शेअर्सच्या किमतीत रोज चढ किंवा उतार हे होतच असतात. गुरुवारच्या सत्रात ‘रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड’ या शेअर्समध्ये झालेली वाढ ही मात्र विशेष होती. याचे सर्वात महत्त्वाचे कारण या शेअर्सच्या किमतीत गुरुवारी झालेल्या वाढीमुळे या कंपनीच्या मार्केट कॅपिटलमध्ये वाढ होत या कंपनीने एक नवीन विक्रम प्रस्थापित केला.
गुरुवारी या कंपनीचे ‘मार्केट कॅपिटल’ ५ लाख करोड रुपयांच्या वर गेले. भारतीय शेअर बाजाराच्या इतिहासाचा विचार करता कोणत्याही कंपनीला ‘मार्केट कॅपिटल’मध्ये आजपर्यंत ५ लाख करोड रुपये किमतीचा टप्पा गाठता आलेला नव्हता. त्यामुळे हा जादूई आकडा गाठणारी भारतीय शेअर बाजारातील ही पहिलीच कंपनी ठरली.
पुढील आठवडय़ाचा विचार करता निर्देशांकाची दिशा आणि गती तेजीची आहे. पुढील आठवडय़ासाठी निर्देशांक सेन्सेक्सची ३१७६० आणि निफ्टीची ९९५० ही अत्यंत महत्त्वाची खरेदीची पातळी आहे. जोपर्यंत या पातळीच्या वर निर्देशांक आहेत तोपर्यंत निर्देशांकातील तेजीची दिशा आणि गती ही कायम राहील. सध्या चालू असलेल्या आंतरराष्ट्रीय घडामोडी तसेच निर्देशांकांचे वाढलेले पी.ई गुणोत्तर या सर्वांचा विचारकरता पुढील काही काळासाठी अल्पमुदतीचा विचार करूनच गुंतवणूक करणे आवश्यक आहे.
टेक्निकल अॅनालिसिसनुसार मेथन अलॉय, मॅजेस्को लिमिटेड, ब्रिटानिया लिमिटेड, सनफार्मा, बायोकॉन यासह अनेक शेअर्सची दिशा ही तेजीची आहे. अल्पमुदतीचा विचार करीता ‘स्टरिलाईट टेक्नोलॉजीज लिमिटेड’ या शेअरमध्ये तेजी सांगणारी विशेष रचना तयार झालेली असून आज २६८.६० रुपये किमतीला असणा-या या शेअरमध्ये पुढील काळात आणखी वाढ होणे अपेक्षित आहे. शुक्रवारी निर्देशांक सेन्सेक्स ३२४३२.७० आणि निफ्टी १०१६७.४५ अंकाना बंद झाले.
करन्सी मार्केटमध्ये या आठवडय़ात डॉलरमध्ये घसरण झाली. सध्या डॉलरमध्ये तात्पुरती मंदी आलेली आहे. अल्पमुदतीच्या चार्टनुसार डॉलरची दिशा ही तेजीचीच असून जोपर्यंत डॉलर ६४.७० रुपये किमतीच्या वर आहे तोपर्यंत डॉलरमधील तेजी कायम राहील.
कमोडीटी मार्केटमध्ये टेक्निकल अॅनालिसिसनुसार चांदी या मौल्यवान धातूची दिशा तेजीची असून अल्पमुदतीच्या चार्टनुसार जोपर्यंत चांदी ३९००० या पातळीच्या वर आहे तोपर्यंत चांदी या धातूमधील तेजी टिकून राहील. याशिवाय सोने या मौल्यवान धातूची दिशा देखील तेजीची असून जोपर्यंत सोने २९२५० या पातळीच्या वर आहे तोपर्यंत सोन्यामधील तेजी कायम राहील.
या आठवडय़ात झालेल्या तेजीत निफ्टीने नवीन उच्चांक नोंदविला असला तरी निर्देशांक सेन्सेक्सला या आठवडय़ात झालेल्या तेजीत आपला पूर्वीचा उच्चांक अजूनही तोडता आलेला नाही, ही बाब लक्षात ठेवून गुंतवणूक करणे आवश्यक आहे. सर्व वाचक गुंतवणूकदारांना दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा. शेअर बाजारात अभ्यासपूर्वक आणि संयम ठेवून गुंतवणूक केली तर लक्ष्मी तुमच्यावर सदैव प्रसन्न राहील, यात कोणतीही शंका नाही.
(सूचना : लेखकाची तसेच त्यांच्या जवळच्या नातेवाइकांची लेखात सुचवीत असलेल्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये कोणतीही गुंतवणूक नाही किंवा सुचविलेल्या कंपन्यांशी लेखकाचा कुठलाही संबंध नसून कंपनीकडून कोणतेही मानधन किंवा भेटवस्तू घेतलेली नाही)
(samrajyainvestments@gmail.com)