जम्मू-काश्मीरमध्ये सरकारच्या शपथविधीपूर्वी पीडीपीचे प्रमुख मुफ्ती मोहोम्मद सईद यांनी शुक्रवारी सकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.
नवी दिल्ली – जम्मू-काश्मीरमध्ये नव्या सरकारच्या शपथविधीपूर्वी पीडीपीचे प्रमुख मुफ्ती मोहोम्मद सईद यांनी शुक्रवारी सकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. या बैठकीत मंत्रिमंडळाची अंतिम यादी निश्चित करण्यात आली.
पीडीपी-भाजपा हे परस्परविरोधी विचारांचे पक्ष जम्मू-काश्मीरमध्ये सत्ता स्थापनेसाठी एकत्र आले असून, येत्या रविवारी नव्या सरकारचा शपथविधी होणार आहे. मुफ्ती मोहोम्मद सईद नऊ वर्षानंतर जम्मू-काश्मीरच्या मुख्यमंत्रीपदाची सूत्रे संभाळणार आहेत.
दोन महिन्यानंतर आमच्यात सरकार स्थापनेवर एकमत झाले. भाजपाला जम्मूमध्ये तर, आम्हाला काश्मीर खो-यात मते मिळाली आहेत. आम्ही दोन्ही पक्षांनी एकत्र येण्याचा निर्णय घेतला. येत्या एक मार्चला होणा-या शपथविधीला पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित रहातील अशी माहिती बैठकीनंतर बाहेर पत्रकारांशी बोलताना मुक्ती मोहोम्मद सईद यांनी दिली.
जम्मू-काश्मीरमध्ये सरकार चालवण्यासाठी पीडीपी-भाजपने किमान समान कार्यक्रम तयार केला आहे. सईद गुरुवारी संध्याकाळी नवी दिल्लीत आले. शुक्रवारी सकाळी त्यांनी पंतप्रधानांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली.
जम्मू-काश्मीरमध्ये २५ जागा जिंकणारा भाजप प्रथमच सरकारमध्ये सहभागी होत आहे. डिसेंबरमध्ये जाहीर झालेल्या जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणुकीच्या निकालात जनतेने कुठल्याही एकापक्षाला स्पष्ट बहुमत न देता त्रिशंकू कौल दिला. जवळपास पंधरापेक्षा अधिक चर्चेच्या फे-यांनंतर पीडीपी-भाजपमध्ये सत्ता स्थापनेवर एकमत झाले.