पाकिस्तानकडून रविवारी रात्री पुन्हा एकदा नव्याने शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्यात आले.
जम्मू – पाकिस्तानकडून रविवारी रात्री पुन्हा एकदा शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्यात आले. यावेळी पाकिस्तानी सैन्याने जम्मू-काश्मीरच्या पूंछ जिल्ह्यातील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरील अनेक भारतीय चौक्यांवर मोठ्या प्रमाणात गोळीबार केला.
पूंछ जिल्ह्यातील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरील अनेक भारतीय चौक्यांना पाकिस्तानी सैन्याने लक्ष्य केले. यावेळी लहान शस्त्रास्त्रांच्या सहाय्याने त्यांनी चौक्यांवर हल्ला केला. रात्री १० वाजून ४५ मिनिटांच्या सुमारास पाकिस्तानने गोळीबार केला.
भारतीय सैन्यानेही पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर दिले. रात्री साडेअकरा वाजेपर्यंत गोळीबार सुरु होता. या गोळीबारात कोणतीही जिवितहानी झाली नसल्याचे लष्कर प्रवक्त्यांनी सांगितले.
१५ जुलैपासून पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचा भंग कऱण्याची ही सातवी घटना आहे. गेल्या पाच दिवसांत पाकिस्तानने केलेल्या गोळीबारात एक जण ठार तर १६ जण जखमी झाले आहेत.
आतापर्यंत जुलै महिन्यात पाकिस्तानकडून ११ वेळा शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्यात आले आहे. शनिवारी पाकिस्तानी सैन्याने राजौरी जिल्ह्यातील नौशेरा सेक्टर आणि पूंछ जिल्ह्यातील दोन गावांवर केलेल्या गोळीबारात पाच नागरिक जखमी झाले होते.