४९० धावांच्या मोठय़ा आव्हानाचा पाठलाग करताना तिस-या दिवसअखेर शनिवारी पाहुण्यांची अवस्था २ बाद ७० धावा अशी झाली.
ब्रिस्बेन- ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या कसोटीत पाकिस्तान पराभवाच्या छायेत आहे. ४९० धावांच्या मोठय़ा आव्हानाचा पाठलाग करताना तिस-या दिवसअखेर शनिवारी पाहुण्यांची अवस्था २ बाद ७० धावा अशी झाली.
पाकिस्तानच्या दुस-या डावात अझर अली (खेळत आहे ४१) आणि सामी अस्लमने (१५) सावध सुरुवात करून दिली तरी वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्कने अस्लमला बाद करत सलामी फोडली. अझरने विकेट शाबूत ठेवली तरी बाबर आझमला (१४) लवकर माघारी धाडण्यात ऑफस्पिनर नॅथन लियॉनला यश आले. पाकिस्तानला विजयासाठी आणखी ४२० धावा हव्या आहेत. मात्र त्यांच्या आठ विकेट शिल्लक आहेत. यजमानांचा तिखट मारा पाहता उर्वरित दोन दिवस खेळून काढणे, तितके सोपे नाही. सलामीवीर अझर अलीसह युनूस खान, कर्णधार मिसबा-उल-हक, असद शफीक आणि सर्फराझ अहमद किती वेळ खेळपट्टीवर थांबतात, त्यावर पाकिस्तान संघ किती काळ पराभव लांबवतो, हे अवलंबून आहे.
२८७ धावांनी आघाडी घेतलेल्या ऑस्ट्रेलियाने दुसरा डाव ५ बाद २०२ धावांवर घोषित करताना पाहुण्यांसमोर मोठे आव्हान उभे केले. यजमानांची सुरुवात खराब झाली. सलामी जोडी सहाव्या षटकात पॅव्हेलियनमध्ये परतली. मात्र उस्मान ख्वाजाने (७४) कर्णधार स्टिव्हन स्मिथसह (६३) तिस-या विकेटसाठी १११ धावांची भागीदारी करताना ऑस्ट्रेलियाला सुस्थितीत आणले. त्यानंतर स्मिथने पीटर हँडस्काँबसह (नाबाद ३५) चौथ्या विकेटसाठी ५१ धावा जोडताना संघाला दोनशेपार नेले. तत्पूर्वी, ८ बाद ९७ वरून पाकिस्तानचा दुसरा डाव २०२ धावांत संपला. पाहुण्यांचे शेपूट वळवळले. त्यात सर्फराझ अहमदचा (नाबाद ५९) मोठा वाटा आहे. त्याने त्याने मोहम्मद आमीरसह (२१) नवव्या विकेटसाठी ५४ धावांची भागीदारी करताना पाकिस्तानला दीडशेच्या घरात नेले. ऑस्ट्रेलियातर्फे मिचेल स्टार्क, जोश हॅझ्लेवुड आणि जॅक्सन बर्ड या वेगवान त्रिकुटाने प्रत्येकी तीन विकेट घेतल्या.
संक्षिप्त धावफलक
ऑस्ट्रेलिया- ४२९ आणि ५ बाद २०२ डाव घोषित (उस्मान ख्वाजा ७४, स्टीव्हन स्मिथ ६३, पीटर हँडस्काँब नाबाद ३५)
पाकिस्तान- १४२ (सर्फराझ अहमद नाबाद ५९, जोश हॅझ्लेवुड २२-३, बर्ड २३-३, मिचेल स्टार्क ६३-३) आणि २ बाद ७०
(अझर अली खेळत आहे ४१, नॅथन लियॉन १३-१).