पाकिस्तानी कलाकारांच्या भारतात काम करण्याला शिवसेनेचा असलेला विरोध माहित असतानाही पाकिस्तानी अभिनेत्री माहिरा खानने एका छायाचित्रातून शिवसेनेला डिवचले आहे.
मुंबई- पाकिस्तानी कलाकारांच्या भारतात काम करण्याला शिवसेनेचा असलेला विरोध माहित असतानाही पाकिस्तानी अभिनेत्री माहिरा खानने एका छायाचित्रातून शिवसेनेला डिवचले आहे.
माहिरा खानने पाकिस्तानी दिग्दर्शक असीम रझा याच्यासोबत एक फोटो काढला आहे.
दिग्दर्शक असीम रजा याने दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यासारखा पेहराव केला असून माहिराने त्यात असीम रजा सोबत पोज दिली आहे.
छायाचित्रात असीमने ‘माहिरा को बाहर निकालो’ असा फलक हाती धरला आहे. हा फोटो सध्या सोशल मीडियावर चांगलाच फिरत आहे. याप्रकरणी शिवसेनेकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.
शिवसेनेने पाकिस्तानी कलाकारांना विरोध करत फवाद खान आणि माहिराला महाराष्ट्रात काम करू देणार नाही, असा इशारा दिला आहे.
माहिरा खान ही शाहरूख खानच्या ‘रईस’ या आगामी चित्रपटात मुख्य भुमिकेत दिसणार आहे. ‘रईस’ पुढच्या वर्षी ईदच्या सुमारास प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाच्या प्रदर्शनावेळी शिवसेना काय भूमिका घेते, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.