पाकिस्तानच्या तहरीक-ए-इन्साफ पक्षाचे प्रमुख इम्रान खान यांनी शनिवारी पाकिस्तानच्या २२व्या पंतप्रधानपदाची शपथ घेतली.
इस्लामाबाद- पाकिस्तानच्या तहरीक-ए-इन्साफ पक्षाचे प्रमुख इम्रान खान यांनी शनिवारी पाकिस्तानच्या २२व्या पंतप्रधानपदाची शपथ घेतली. काळ्या रंगाची शेरवानी परिधान केलेल्या इम्रान यांनी उर्दूतून शपथ घेतली. काँग्रेस नेते व माजी क्रिकेटपटू नवज्योत सिंह सिद्धू यांच्यासह पाकिस्तानातील अनेक माजी आणि विद्यमान क्रिकेटपटू या सोहळ्याला उपस्थित होते. अत्यंत साध्या समारंभात हा शपथविधी सोहळा पार पडला.
इम्रान खान यांचा पक्ष २५ जुलैला झालेल्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये सर्वाधिक जागांवर निवडून आला, पण पक्षाकडे बहुमत नव्हते. शुक्रवारी पाकिस्तानी संसदेत इम्रान खान यांना १७६ मते मिळाली आणि लहान पक्षांच्या आधारे बहुमतापर्यंत जेमतेम पोहोचत अखेर इम्रान यांचा पंतप्रधानपदाचा मार्ग मोकळा झाला.
सिद्धू यांना मानाचे स्थान
इम्रान खान यांच्या शपथविधी सोहळ्याला भारतीय क्रिकेटपटू नवज्योत सिंग सिद्धू यांनी हजेरी लावली होती. सिद्धू यांना या शपथविधी कार्यक्रमामध्ये मानाचे स्थान मिळाले. पण सिद्धू यांनी पाकिस्तानमधील सोहळ्याला हजेरी लावली म्हणून त्यांच्यावर टीकेचा भडीमार सुरू आहे. शपथविधी सोहळ्याच्या आधी सिद्धू यांनी पाकचे लष्करप्रमुख कमर बाजवा यांची गळाभेट घेतली. सिद्धू यांनी लष्करप्रमुखांची गळाभेट घेतल्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. भारताविरोधात दहशतवादी कारवायांना प्रोत्साहन देणा-या पाकिस्तानी लष्कराच्या प्रमुखांना सिद्धूंनी दिलेल्या आलिंगनामुळे काँग्रेसमध्ये अस्वस्थता पसरली आहे, तर विरोधकांनी हा मुद्दा उचलत टीका केली आहे. इम्रान खान यांच्या शपथविधी सोहळ्याला सिद्धू यांना मानाचे स्थान देण्यात आले होते. या सोहळ्यात सिद्धू यांना पहिल्या रांगेत स्थान देण्यात आले होते. सिद्धू यांना पाकव्याप्त काश्मिरचे राष्ट्रपती मसूद खान यांच्या बाजूला स्थान देण्यात आले होते.
सिद्धूचा ‘मास्टरस्ट्रोक’
इम्रान खान यांच्या शपथविधी सोहळ्याला राजकारणी म्हणून नव्हे, तर मित्र म्हणून आलोय, असे सिद्धू यांनी स्पष्ट केले. परंतु, काश्मीरसाठी आतुर असलेल्या मित्रासाठी खास काश्मिरी शाल भेट नेण्याच्या त्यांच्या खेळीला त्यांचे चाहते ‘छा गए गुरू’ अशी दाद देत आहेत. कारण, काश्मीर आमचे आहे, ही आमच्या देशातील भेट आहे, असा सूचक संदेशही त्यांनी या भेटीतून दिल्याचे बोलले जात आहे.