पाकिस्तानचा ऑफ स्पिनर सईद अजमल याच्यावर आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने घातलेली बंदी उठवण्यात आल्याने तो पुन्हा एकदा संघात परतला आहे.
कराची – बांगलादेश दौ-यासाठी पाकिस्तानच्या कसोटी, एकदिवसीय आणि टी-२० संघांची घोषणा शुक्रवारी झाली. या संघांत अव्वल ऑफस्पिनर सईद अजमलचा समावेश आहे. तब्बल सात महिन्यानंतर त्याचे पुनरागमन झाले. तिन्ही प्रकारांसाठी अजमलची निवड झाली आहे.
अवैध शैलीमुळे अजमलला विश्वचषकाला मुकावे लागले. मात्र नव्याने दिलेल्या चाचणीनंतर आयसीसीने गोलंदाजीची शैली वैध ठरवल्यानंतर अजमलचा आंतरराष्ट्रीय पुनरागमनाचा मार्ग मोकळा झाला.
पाकिस्तानतर्फे गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये (वि. श्रीलंका) तो शेवटचा सामना खेळला होता. बांगलादेशविरुद्ध कसोटी संघाचे नेतृत्व मिसबा-उल-हककडे कायम आहे. एकदिवसीय संघाची जबाबदारी अझर अलीकडे सोपवण्यात आली आहे. टी-२० संघाचे नेतृत्व शाहीद आफ्रिदी करेल.
विश्वचषकात प्रभाव पाडू न शकलेला फलंदाज उमर अकमलचा एकाही संघात समावेश नाही. अजमलसह मोहम्मद हफीझ, असद शफीक, फवाद अलम, अझर अली, मोहम्मद रिझवान आणि समी अस्लमला वनडे संघात स्थान मिळाले आहे. मात्र नसिर जमशेद, अहमद शहझादला वगळण्यात आले आहे.
कसोटी संघातून एहसान अदिल, इम्रान खान, मोहम्मद ताल्हा, शान मसूद आणि तौफिक उमरला बाहेरचा रस्ता दाखवण्यात आलाय. मात्र बाबर आझम, समी अस्लम, वहाब रियाझ, जुनेद खान आणि सोहेल खानला संधी मिळालीय. टी-२० संघात मुख्तार अहमद, शोएब मकसूद, मोहम्मद रिझवान, सोहेल खान आणि जुनेद खानचा समावेश आहे.
मात्र अन्वर अली, अवाईस झिया, रझा हसनला वगळण्यात आलेय.पाकिस्तानचा बांगलादेश दौरा साधारणपणे १७ एप्रिलपासून सुरू होणार आहे. सुरुवातीला तीन एकदिवसीय लढती, पाठोपाठ दोन कसोटी आणि एका टी-२० लढतींचा त्यात समावेश आहे.