भारताचा पारंपरिक शत्रू पाकिस्तान आहे. पाकिस्तानकडून भारतात सातत्याने दहशतवादी कारवाया करण्यात येतात. मात्र…
भारताचा पारंपरिक शत्रू पाकिस्तान आहे. पाकिस्तानकडून भारतात सातत्याने दहशतवादी कारवाया करण्यात येतात. मात्र, याच पाकिस्तानला अमेरिकेने शस्त्रांचा पुरवठा वाढवल्याची धक्कादायक माहिती खुद्द पेंटागॉनने दिली आहे. पेंटागॉनने ‘परदेशी लष्करी विक्री’ करारातील कागदपत्रे खुली केली असून त्यात ही माहिती उघड झाली आहे. २००२ ते २०१२ या काळात अमेरिकेने पाकिस्तानला ५.२ अब्ज (३० हजार कोटी) डॉलर्सच्या शस्त्रास्त्रांची विक्री केली.
अमेरिकी सैन्याने मे २०११ मध्ये पाकिस्तानातील अबोटाबाद येथे ओसामा बिन लादेनची हत्या केली. त्यानंतर अमेरिका व पाकिस्तानचे संबंध पुन्हा सुरळीत सुरू झाले. गेल्या वर्षभरात अमेरिकेने पाकिस्तानला ३५ ‘एफ-१६’ ही अत्याधुनिक विमाने, ३७४ चिलखती वाहने, १५० अतिरिक्त रेडिओ सेट्स पुरवले आहेत.
२००१ पासून पाकिस्तानला परदेशी लष्करी वित्तपुरवठयाअंतर्गत ३ अब्ज डॉलर्स दिले आहेत. तर आणखी दोन अब्ज डॉलर्स यापूर्वीच देण्यात आले आहेत. हा निधीतून अमेरिकेकडून शस्त्रास्त्र सामग्री खरेदी करायची होती.
या अंतर्गत आठ ‘पी-३ सी’ ओरियन टेहळणी विमान, क्षेपणास्त्र, टेहळणी रडार, ‘सी-१३०इ’ हक्र्युलस ट्रान्सपोर्ट विमानेही देण्यात आली. तसेच पेरी वर्गातील यूएसएस मॅकइनर्नी, कोब्रा हेलिकॉप्टर, फाल्कन कॉम्बट विमान, लष्करी प्रशिक्षण विमाने, ‘एफ-१६’ विमान, ५०० हवेतून हवेत मारा करणारी क्षेपणास्त्र, दोन हजार पौंडाचे बॉम्ब, ग्रॅव्हिटी बॉम्ब, बेल हेलिकॉप्टर, चार बहुउद्देशीय हेलिकॉप्टर आदींचा पुरवठा पाकिस्तानला केला आहे. दरम्यान, अफगाणिस्तातून जाण्यापूर्वी पाकिस्तानी लष्कराला भरभक्कम शस्त्रपुरवठयाचा मानस अमेरिकेने केला आहे. तसेच आंतरराष्ट्रीय लष्करी शिक्षण आणि प्रशिक्षण योजनेअंतर्गत अमेरिकेने पाकिस्तानच्या दोन हजार लष्करी अधिका-यांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे.