आत्मघातकी हल्ल्यात पाकिस्तानच्या पंजाब प्रांताचे गृहमंत्री शुजा खनझदा यांच्यासह १२ जण ठार झाले असून २० जण जखमी झाले.
लाहोर- पाकिस्तानच्या पंजाबच्या प्रांताचे गृहमंत्री शुजा खनझदा यांची रविवारी आत्मघातकी हल्ल्यात हत्या करण्यात आली. या हल्ल्यात खनझदा यांच्यासह १२ जण ठार झाले असून २० जण जखमी झाले आहेत. दरम्यान, या हल्ल्याची जबाबदारी लष्कर-ए-जांगवी या दहशतवादी संघटनेने घेतली आहे.
शादी खान गावातील खनझदा यांच्या राजकीय कार्यालयात खनझदा यांची भेट घेण्यासाठी आत्मघातकी हल्लेखोर दाखल झाला. तेथे त्याने स्वत:ला उडवून दिले. या हल्ल्यात त्यांच्या सुरक्षेसाठी तैनात केलेले पोलीस उप अधीक्षक शौकत शहा हे ही ठार झाले. खनजदा यांचा मृतदेह अटोक जिल्हा रुग्णालयात नेण्यात आला, अशी माहिती पंजाबच्या मुख्यमंत्र्यांचे सल्लागार सईद इलाही यांनी दिली.
खनजदा हे माजी लष्करी अधिकारी असून त्यांनी आपल्या घरात स्थानिक नागरिकांची बैठक बोलवली होती. या हल्ल्यानंतर इमारतीचे छत कोसळले आहे. या ढिगा-याखालील नागरिकांना बाहेर काढण्याचे काम वेगाने सुरू आहे.