जगज्जेता विश्वनाथन आनंद आणि त्याचा जगज्जेतेपदाच्या लढतीतील आव्हानवीर मॅग्नस कार्लसन यांच्यात शुक्रवारी पाचवा डाव रंगेल.
चेन्नई- जगज्जेता विश्वनाथन आनंद आणि त्याचा जगज्जेतेपदाच्या लढतीतील आव्हानवीर मॅग्नस कार्लसन यांच्यात शुक्रवारी (१५ नोव्हेंबर) पाचवा डाव रंगेल. पहिले चारही डाव बरोबरीत संपल्याने आता या लढतीतील पहिल्या विजयाची नोंद पाचव्या डावात होते का हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल. या डावात आनंद काळ्या मोह-यांनी खेळेल.
पहिले दोन डाव लवकर संपल्यावर तिसरा आणि चौथा डाव चांगलाच रंगला. त्यात दोघांनाही एकमेकांच्या चालींना चोख उत्तर देत विजयाचे प्रयत्न हाणून पाडले. तिसरा डाव जवळपास साडेचार तास तर बुधवारी झालेला चौथा डाव सहा तास रंगला. ते पाहता आता प्रत्येक डावामागे रंगत वाढत जाणार हे निश्चित आहे. तिस-या डावात कार्लसनने आनंदला बरोबरी मान्य करायला लावल्यावर चौथ्या डावात आनंदने भक्कम बचाव केला होता.
आनंदने बुधवारी पत्रकार परिषदेत ही बाब मान्य केली. ‘‘सुरुवातीच्या काही चाली चुकल्या. डावाचा शेवट जवळ आला असताना मी धास्तावलो होतो. दोनवेळा मी टाइम कंट्रोलमध्ये स्वत:ला वाचवले,’’ असे आनंदने म्हटले. कार्लसनने त्याच्या खेळाबाबत समाधान व्यक्त केले. ‘‘आनंदने प्रत्येकवेळी बचावाचा मार्ग शोधला याउलट मी काही संधी गमावल्या. टाइम कंट्रोलपूर्वी मी जिंकेन असे मला वाटले होते. मात्र माझ्या प्रत्येक चालीवर आनंदने दमदार चाली खेळल्या,’’ असे कार्लसनने म्हटले.
ट्विटरवर सर्वाधिक बुद्धिबळ
भारतात ट्विटरवर प्रथमच बुद्धिबळ सर्वात जास्त प्रमाणात ‘फॉलो’ केले गेल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे सचिन तेंडुलकरची शेवटची २००वी कसोटी सुरू होण्याच्या एक दिवस आधी बुद्धिबळाला सर्वाधिक पसंती मिळाली आहे. त्याबात हयात रिजन्सी येथे समालोचन करणारे ग्रॅँडमास्टर आरबी रमेश यांनी आश्चर्य व्यक्त केले.