दिवसेंदिवस प्रदूषणाचे प्रमाण वाढत चालले आहे, त्यामुळे मोठया प्रमाणावर पर्यावरणाचा -हास होत आहे. अशा प्रदूषणाला आळा घालण्यासाठी नानापरीच्या पर्यावरणविषयक मोहिमा चालवल्या जातात. ‘सन-स्ट्रोकमुळे माझा चेहरा खराब झालाय.. पोल्युशनमुळे हेअर फॉल होतोय..’ अशी वाक्यं आजकाल सारखी ऐकू येत आहेत. सौंदर्याचे महत्त्व जाणलेल्या तरुणांचा ते जपण्यासाठी का होईना अशा मोहिमांमध्ये सहभाग मोठया संख्येने दिसू लागला आहे.
मुंबई म्हणजे कधी न झोपणारी मायानगरी. इथे रात्रंदिवस गाडय़ांची वर्दळ चालूच असते, अशा शहरांमधील प्रदूषणाचे प्रमाण अति झाल्यामुळे योग्य वेळेतच हे प्रमाण कमी करणं गरजेचं झालं आहे. त्यामुळे मुंबईत क्लीन मुंबई ग्रीन मुंबई, गो ग्रीन सारख्या मोहिमा राबवल्या जातात. मुंबईप्रमाणे इतर शहरातही प्रदूषणाचे प्रमाण वाढत चालले आहे. अशा प्रदूषणाला आळा घालण्यासाठी तरुण पुढे येताना दिसून येत आहेत, अशाच काही तरुणांनी पुढे येऊन एक वेगळी मोहीम आखली आहे. आयडीएफसी इंडिया या आर्थिक क्षेत्रात आघाडीवर असलेल्या कंपनीच्या वतीने ‘इन अवर हॅण्ड्स’ नामक पर्यावरण आणि संवर्धनाची मोहीम सुरू केली. यामध्ये १५ शहरांतील ३०० पेक्षाही अधिक तरुणांना सहभागी करून घेतलं आहे. या मोहिमेचा मूळ विषय पर्यावरण आणि संवर्धन असून त्यामध्ये कार्बन फूट प्रिंट, जमीन, पाणी अशा इतर विषयांचा समावेश करण्यात आला आहे.
या मोहिमेची सुरुवात १९ ऑगस्ट २०१३ ला मुंबईच्या सेंट अॅन्ड्रयूज कॉलेजमध्ये करण्यात आली. १९ ऑगस्टला फ्लॅशमॉब करून पहिला इव्हेंट साजरा करण्यात आला. प्रदूषणविरोधी जनजागृती करण्यासाठी याचं आयोजिन केलं होतं. त्याची टॅगलाइन ‘don’t be fuelish’’ अशी होती, या टॅगलाइनमार्फत त्यांनी इंधनाचा वापर योग्य रितीने आणि कमी प्रमाणात करा असा संदेश दिला. सहभागी विद्यार्थ्यांनी उत्साहपूर्ण गाण्यांवर फ्लॅशमॉब करून डान्सच्या माध्यमातून प्रदूषणविषयक संदेश देण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर ‘क्लीन ड्राइव्ह’ नामक इव्हेंट आयोजित करण्यात आला होता. मुंबईतील काही भाग निश्चित करून त्यांची साफसफाई करावी अशी या इव्हेंटची कल्पना होती. २० ऑगस्टला घेण्यात आलेल्या या क्लीन ड्राइव्हसाठी सेंट अॅन्ड्रयूज कॉलेज ते हिल रोड हा परिसर निवडण्यात आला आणि सहभागी विद्यार्थ्यांनी तिथे जाऊन साफसफाई केली. २१ ऑगस्टला रिसायकल डे साजरा करण्यात आला. ज्यामध्ये नावाप्रमाणेच टाकाऊ वस्तू जमा करून त्यापासून नवीन वस्तूंची निर्मिती करण्यात आली आणि त्या वस्तू एनजीओला देण्यात आल्या.
त्यानंतरच्या इव्हेंट्समध्ये विविध प्रकारच्या खेळांचा सामावेश करण्यात आला होता. यामध्ये रींक फुटबॉलसारखे खेळ होते आणि त्यात एकूण ३४ टीम सहभागी झाल्या होत्या. मुंबईतील अंतिम फेरी १२ सप्टेंबर रोजी सेंट अॅन्ड्रयूज कॉलेजमध्ये आयोजित करण्यात येणार आहे. यामध्ये विविध आंतरमहाविद्यालयीन स्पर्धाचं आयोजन करण्यात येणार असून त्यात विद्यार्थ्यांसाठी सिटी जर्नलिस्ट, वादविवाद, चर्चासत्र, माहितीपटांची निर्मिती, प्रश्नमंजूषा, ऑनलाइन निबंध स्पर्धा इत्यादीचा सामावेश आहे. सेंट झेवियर्स, मिठीबाई, सेंट अॅन्ड्रयूज,जयहिंद, एनएल दालमिया, रहेजा अशी कॉलेजेस या स्पर्धामध्ये भाग घेणार आहेत. ‘इन अवर हॅण्ड्स’ या मोहिमेच्या माध्यमातून देशातील तरुणाईला पर्यावरणाशी निगडित अडचणींवर भावना व्यक्त करण्याची संधी मिळेल.