बुद्धिबळ जगज्जेता विश्वनाथन आनंदने सोमवारी लंडन बुद्धिबळ क्लासिक स्पर्धेच्या दुस-या फेरीत इंग्लंडच्या ल्यूक मॅक्शेनविरुद्धचा डाव बरोबरीत सोडवण्यात यश मिळवले.
लंडन- बुद्धिबळ जगज्जेता विश्वनाथन आनंदने सोमवारी लंडन बुद्धिबळ क्लासिक स्पर्धेच्या दुस-या फेरीत इंग्लंडच्या ल्यूक मॅक्शेनविरुद्धचा डाव बरोबरीत सोडवण्यात यश मिळवले. मॅक्शेनविरुद्ध पांढ-या मोह-यांनिशी खेळण्याचा फायदा आनंदला घेता आला नाही. याउलट मॅक्शेनने काही सुरेख चाली करत आनंदला दडपणात आणले. मात्र पराभवापासून आनंदने स्वत:ला वाचवले. शेवटी १०८ चालींनंतर आनंद आणि मॅक्शेन यांनी बरोबरी मान्य केली. दोघांचेही आता प्रत्येकी एक गुण झाला आहे. या स्पर्धेच्या पहिल्या फेरीत आनंदला ‘बाय’ मिळाला होता.
अन्य लढतींमध्ये अव्वल मानांकित नॉर्वेच्या मॅग्नस कार्लसनने दुस-या सीडेड अर्मेनियाच्या लेवॉन अरोनियनचा ५९ चालींमध्ये पराभव केला. अमेरिकेच्या हिकरू नाकामुराला मात्र रशियाच्या व्लादिमिर क्रॅमनिककडून ८७ चालींमध्ये पराभव स्वीकारावा लागला. क्रॅमनिक आणि अरोनियन यांनी प्रत्येकी सहा गुणांसह संयुक्तपणे अव्वल स्थान पटकवले.