किंग्ज इलेव्हन पंजाब आणि राजस्थान रॉयल्समध्ये मंगळवारी रात्री खेळला गेलेला सामना आयपीएलच्या आठव्या सत्रातील सर्वात रंगतदार सामना ठरला.
अहमदाबाद – किंग्ज इलेव्हन पंजाब आणि राजस्थान रॉयल्समध्ये मंगळवारी रात्री खेळला गेलेला सामना आयपीएलच्या आठव्या सत्रातील सर्वात रंगतदार सामना ठरला. यंदाच्या हंगामातील सुपरओव्हरव्दारे निकाल लागलेला हा पहिलाच सामना ठरला.
सुपरओव्हरमध्ये पंजाबने विजय मिळवत राजस्थानचा सुसाट निघालेला विजयरथ रोखला. राजस्थानचा सलग पाच विजयानंतर हा पहिला पराभव ठरला. प्रथम फलंदाजी करणा-या राजस्थानने अजिंक्य रहाणेच्या ५४ चेंडूतील (७४) आणि शेन वॅटसनच्या (४५) धावांच्या जोरावर १९१ धावा केल्या.
पंजाबकडून शॉन मार्श ४० चेंडूत (६५) आणि डेव्ही़ड मिलरने ३० चेंडूत (५४) धावा फटकावत पंजाबला विजयासमीप नेले. शेवटच्या चेंडूवर पंजाबला विजयासाठी पाच धावांची आवश्यकता असताना अक्षर पटेलने जेम्स फॉकनरला चौकार लगावत राजस्थानच्या १९१ धावांची बरोबरी केली आणि सामना सुपरओव्हरमध्ये गेला.
सुपरओव्हरमध्ये एका षटकाचा खेळ असतो. शॉन मार्शने ख्रिस मॉरिसला सलग तीन चौकार लगावत १५ धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल राजस्थानला सहा चेंडूत फक्त सहा धावा करता आल्या आणि पंजाबने नऊ धावांनी सामना जिंकत राजस्थानचा विजयरथ रोखला.