रायगडमधील माथेरान पर्यटनस्थळी जाणारा नेरळ-माथेरान रस्त्याची कमालीची दुरवस्था झालेली होती. या बाबत ‘दैनिक प्रहार’ प्रहारमध्ये वृत्त प्रसिद्ध झाले होते.
कर्जत- रायगडमधील माथेरान पर्यटनस्थळी जाणारा नेरळ-माथेरान रस्त्याची कमालीची दुरवस्था झालेली होती. या बाबत ‘दैनिक प्रहार’ प्रहारमध्ये वृत्त प्रसिद्ध झाले होते. त्यानंतर आता आठ कि.मी. रस्त्याचे दुरुस्ती काम सुरू झाले आहे.
या रस्त्यावरून पर्यटकांच्या वाहनांची ये-जा असते. तसेच नेरळ-माथेरान टॅक्सी मालक संघटनेचेही सेवा चालवली जाते. या रस्त्याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाचे मागील तीन वर्षापासून दुर्लक्ष झाले होते.
माथेरान हा डोंगराळ भाग असल्याने या ठिकाणी पर्जन्यमान जास्त आहे. त्यामुळे रस्ते खराब होण्याचे प्रमाणही जास्त असते. शिवाय पर्यटकांच्या सातत्याने ये-जा करणा-या वाहनांमुळेही रस्ते खराब होतात. त्यामुळे या रस्त्याची अधून मधून डागडुजी करण्याची गरज असते.
खराब रस्त्यांमुळे अपघाताचा धोका असल्याने अनेकदा पर्यटक व टॅक्सी मालक संघटनेने रस्ते दुरुस्तीची मागणी करणारे निवेदन दिले होते. अलिकडेच घडलेल्या घटनेत खराब रस्त्यामुळे एक महिला दुचाकीवरून ५० फूट खोल दरीत पडली होती. येथील टॅक्सी मालक संघटनेने रस्त्याची केवळ वरवर डागडुजी न करता पूर्ण डांबरीकरण करण्याची मागणी केली आहे.
मात्र, सार्वजनिक बांधकाम विभाग केवळ वरवरची डागडुजी करण्याचे काम करत असल्याचा संघटनेचा आरोप आहे. रस्ते दुरुस्तीचे सुरू असलेले काम व्यवस्थित केले जात आहे का, याकडे आमचे लक्ष असल्याचे टॅक्सी मालक-चालक संघटनेचे अध्यक्ष प्रवीण पोलकम यांनी सांगितले.