पर्यटक आणि स्थानिकांचा माथेरान प्रवास सुखकर व्हावा, यासाठी नेरळ-माथेरान घाट रस्ता सुरक्षित करण्यात येत आहे.
कर्जत- माथेरान या थंड हवेच्या ठिकाणी नाताळ तसेच नवीन वर्ष असा पर्यटन हंगाम सुरू होणार आहे. माथेरानला हजारोंच्या संख्येने पर्यटक येतात. त्यापैकी ९० टक्के पर्यटक नेरळ-माथेरान घाटरस्त्याने माथेरानच्या दस्तुरी नाका येथे पोहचतात. त्यामुळे पर्यटक आणि स्थानिकांचा माथेरान प्रवास सुखकर व्हावा, यासाठी नेरळ-माथेरान घाट रस्ता सुरक्षित करण्यात येत आहे.
नेरळ स्टेशन ते माथेरान दस्तुरी नाका हा ९ किलोमीटरचा रस्ता आहे. त्यातील सात किलोमीटरचा रस्ता घाट रस्ता म्हणून ओळखला जातो. पर्यटन हंगाम असतो, त्या वेळी वाहनांची मोठी वर्दळ या मार्गावर असते. अनेक पर्यटक आपली वाहने घेऊन येत असल्याने वाहतूक कोंडी होते. नवीन वाहनचालक असल्यास या त्रासात अधिकच भर पडते. परिणामी हा मार्ग पर्यटकांना अधिक सुरक्षित व्हावा, असा प्रयत्न कर्जत सार्वजानिक बांधकाम विभागाचा आहे. त्यानुसार नेरळ-माथेरान घाटरस्त्यावरील धोकादायक वळणावर गरजेनुसार तीन ठिकाणी संरक्षण भिंती बांधण्याचे काम प्रगतीपथावर आहे. सोबतच, घाटरस्त्यावर सुरक्षा सूचना लिहिण्याचे काम सुरू आहे. त्यांची कामे पूर्ण होत असल्याने चढावाच्या ठिकाणी वाहनाचा वेग किती असावा, अशा सूचना नव्याने येणा-या पर्यटक आणि वाहन चालकांसाठी मदतीच्या ठरू शकतात.
नेरळ-माथेरान घाटरस्त्यात आणखी एक महत्त्वाची बाब सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने करण्यात येत आहे. दरीच्या बाजूला रस्ता किती आहे आणि दरीच्या बाजूला संरक्षक भिंत आहे किंवा नाही, याची माहिती व्हावी, यासाठी संरक्षक भिंती लाल आणि पांढ-या रंगाच्या साहायाय्याने रंगवण्याचे काम कर्जत सार्वजानिक बांधकाम विभाग करत आहे. त्यामुळे पर्यटक आणि प्रवाशांचा माथेरान प्रवास सुखरूप होईल, असा विश्वास बांधकाम विभागाचे उपअभियंता एस. एन. कांबळे यांनी व्यक्त केला आहे. ही सर्व कामे काही दिवसांत पूर्ण करण्याचा बांधकाम विभागाचा प्रयत्न असेल, असा विश्वास शाखा अभियंता चव्हाण यांनी व्यक्त केला.