नेरळ ग्रामपंचायत हद्दीतील जुन्या एसटी स्टँड परिसरात बगिच्यासाठी राखीव भूखंडावर दुकानांचे अनधिकृत बांधकाम झाले आहे. मात्र…
नेरळ– नेरळ ग्रामपंचायत हद्दीतील जुन्या एसटी स्टँड परिसरात बगिच्यासाठी राखीव भूखंडावर दुकानांचे अनधिकृत बांधकाम झाले आहे. मात्र ग्रामपंचायतीकडून बांधकाम तोडून टाकण्याबाबत अद्याप कोणतीही कारवाई झालेली नाही. कोणतीही परवानगी न घेता हे बांधकाम करण्यात आले असून, नेरळ ग्रामपंचायत कारवाईत टाळाटाळ करत असल्याने येथील रहिवाशांत नाराजी आहे.
रुक्मिणीनगर भागातील बिनशेती जमिनीची विक्री केल्यानंतर येथील बगिच्यासाठी राखीव असलेल्या साडेचार गुंठे भूखंडावर बेकायदा बांधकाम करण्यात आले. पूर्वी येथे जादूचे खेळ करण्यासाठी येणाऱ्या काही लोकांची घरे होती. ही घरे हटवून तेथे दुकानांचे गाळे बांधण्यासाठी पाया रचण्यात आला आहे. संबंधित पायाचे दगडी बांधकाम करण्यापूर्वी नेरळ ग्रामपंचायतीची बांधकाम परवानगी घेण्यात आली नसल्याची माहिती ग्रामविकास अधिकारी आर. जी. डोंगरे यांनी दिली. ग्रामपंचायतीने आपले कर्मचारी पाठवून हे बांधकाम तोडण्याच्या सूचना दिल्या होत्या. मात्र महिना लोटला तरी एकही बांधकाम तोडण्यात आलेले नाही.
ग्रामपंचायत प्रशासनच या अनधिकृत दुकान गाळ्यांना संरक्षण देत असल्याची चर्चा असून, ग्रामपंचायत प्रशासनाविरोधात नाराजी आहे. हे अनधिकृत बांधकाम अगदी रस्त्यालगत सुरू असून, यामागे इमारतीचे बांधकाम सुरू आहे. या इमारतीकडे जाणारा रस्ताही बगिच्याच्या जमिनीतून नेण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे नेरळचे कर्तव्यदक्ष सरपंच ही दोन्ही बांधकामांविरोधात कारवाई करतील का, असा प्रश्न ग्रामस्थांनी विचारला आहे.