नेरळ या शहरवजा खेडेगाव असलेल्या गावातील कचरा ज्या कचराडेपोत टाकला जातो, त्या कचरा डेपोने नेरळच्या नाल्यात प्रवेश केला आहे.
नेरळ – नेरळ या शहरवजा खेडेगाव असलेल्या गावातील कचरा ज्या कचराडेपोत टाकला जातो, त्या कचरा डेपोने नेरळच्या नाल्यात प्रवेश केला आहे. माथेरानच्या डोंगरातून वाहून येणारे पाणी ज्या नाल्यातून वाहत पुढे उल्हास नदीत जाते, त्या नाल्याची अवस्था नेरळ ग्रामपंचायतीच्या उदासीनतेमुळे दयनीय होतानादिसत आहे.
नेरळ गावातील कचरा कर्जत-कल्याण रस्त्यालगत धरणाजवळ कचरा डेपोत टाकला जातो. या कचरा डेपोची पूर्वीची जागा दिवसेंदिवस विस्तारत चालली आहे. रस्त्यापासून सुरू होणारा कचरा डेपो पुढे नाल्यापर्यंत विस्तारला आहे. कचरा डेपोत दररोज गोळा होणारा कचरा ग्रामपंचायतीच्या आरोग्य कर्मचा-याकडून नष्ट करण्याचा प्रयत्न केला जातो, मात्र आता पावसाला सुरू असताना कचरा डेपोने नाल्यात प्रवेश केल्यासारखे चित्र आहे.
पावसात हा कचरा पाण्याच्या प्रवाहाबरोबर वाहून जाण्याची शक्यता असते. ही शक्यता लक्षात घेऊन ग्रामपंचायत प्रशासनाने कचरा नाल्यात ढकलण्याचा प्रयत्न केला आहे. परंतु सर्वाधिक पाऊस झालेला असतानाही नाल्यातील हा कचरा वाहून गेलेला नाही. त्यामुळे नाल्याचा अर्धा भाग कच-याने व्यापला आहे. माथेरानच्या डोंगरात पडणा-या पावसाचे पाणी खाली नेरळच्या नाल्यातून वाहत जाते. त्यामुळे माथेरानला पडणारा पाऊस लक्षात घेता, नेरळचा जुना नाला रुंद करण्याची गरज आहे, मात्र या नाल्याचे पात्र कच-यामुळे कमी होताना दिसत आहे.