माझा सध्या निवृत्त होण्याबाबत कोणताच विचार नसून मी इतक्यात निवृत्त होणार नाही असे केंद्रीय संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर यांनी स्पष्ट केले आहे.
नवी दिल्ली- माझा सध्या निवृत्त होण्याबाबत कोणताच विचार नसून मी इतक्यात निवृत्त होणार नाही असे केंद्रीय संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर यांनी स्पष्ट केले आहे. वयाच्या साठीनंतर लोकांनी निवृत्तीचा विचार करायला हवा. मी मागील दोन-तीन वर्षापासून याबाबत विचार करणे सुरू केले होते, पर्रिकर यांच्या या विधानामुळे पर्रिकर निवृत्त होणार, या चर्चेने जोर धरला होता. मात्र, मी राजकारणातून निवृत्त होणार असल्याचे कोणतेच विधान केले नसून माझ्या या विधानाचा विपर्यास केला जात असल्याचा आरोप पर्रिकर यांनी केला आहे.
पणजीतील म्हापुसा शहरात रविवारी लोकमान्य बहुउद्देशीय सहकारी ऋण सोसायटीच्या वतीने एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी मनोहर पर्रिकर बोलत होते. गोव्यासारख्या छोटय़ा राज्यातून दर्जेदार नेते कमी प्रमाणात निर्माण होतात आणि ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे गोव्याकडे माझे लक्ष नेहमीच असेल. जर राज्य सरकार चुकीच्या मार्गावर जात असेल तर त्यांना योग्य मार्गावर घेऊन येणे माझी जबाबदारी आहे, असेही या वेळी पर्रिकर म्हणाले.
माणसाने वयाच्या ६०व्या वर्षी निवृत्ती घ्यावी. मी १३ डिसेंबर रोजी ६० वर्षाचा होत आहे. मागील दोन-तीन वर्षापासून मी याबाबत विचार करत आहे. मोठी जबाबदारी सांभाळण्यात मला आता काहीच स्वारस्य नाही, असे विधान पर्रिकर यांनी या कार्यक्रमात केले होते. त्यांच्या याच वक्तव्यामुळे पर्रिकर राजकारणातून निवृत्त होणार असल्याच्या चर्चा रंगू लागल्या होत्या. मात्र आपल्या बोलण्याचा विपर्यास केला जात असल्याचे पर्रिकर यांनी स्पष्ट केले.