मुंबई महापालिका रुग्णालयांत काम करणा-यां निवासी डॉक्टरांना विम्याचे कवच देण्याचा प्रस्ताव विचाराधीन आहे. याबाबत महापालिकेच्या उच्च स्तरावर चर्चा सुरू आहे.
मुंबई – महापालिका रुग्णालयांत काम करणा-यां निवासी डॉक्टरांना विम्याचे कवच देण्याचा प्रस्ताव विचाराधीन आहे. याबाबत महापालिकेच्या उच्च स्तरावर चर्चा सुरू आहे. सर्व बाबींचा विचार करून त्यानंतर महापालिका अर्थसंकल्पात तरतूद केली जाणार आहे. या प्रस्तावाला मान्यता मिळाल्यास निवासी डॉक्टरांना याचा फायदा मिळेल.
महापालिकेच्या तीन वैद्यकीय महाविद्यालयांत काम करणा-यां निवासी डॉक्टरांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला होता. शीवच्या लोकमान्य टिळक रुग्णालयात एका महिला डॉक्टरचा क्षयरोगाने मृत्यू झाला. तसेच नायर रुग्णालयातही एका परिचारिकेचा मृत्यू झाला होता. क्षयरोगाने डॉक्टर त्रस्त झाल्याने त्यांना सकाळची न्याहारी देण्यास सुरुवात करण्यात आली आहे. असे असतानाच या डॉक्टरांना आता विम्याचे कवच देण्याचा विचार महापालिका वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभाग करत आहे.
मे महिन्यात निवासी डॉक्टरांनी विविध मागण्यांसाठी संप केला होता. त्या वेळी राज्य सरकारने या मागण्यांवर चर्चा करण्याचे आश्वासन दिले होते. तीन वर्षापूर्वी राज्य सरकारने निवासी डॉक्टरांना विम्याचे संरक्षण देण्यात येईल, असे सांगितले होते. मात्र कोणतीही विमा कंपनी त्यासाठी पुढे येत नव्हती. अखेर राज्य सरकारने हा प्रस्तावच गुंडाळला. एवढेच नव्हे, तर मार्ड संघटनेने राज्य सरकारला विम्याची रक्कम डॉक्टर निधी म्हणून जमा करावी, असे सांगितले होते. तेव्हाही वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभागाने निधी नसल्याचे कारण पुढे केले.
निवासी डॉक्टरांना आजाराची बाधा झाल्यास उपचाराचा खर्च त्यांना परवडणारा नाही. त्यामुळे अशा डॉक्टरांना विम्याचे संरक्षण दिल्यास त्याचा निश्चितच फायदा होईल. या प्रस्तावावर चर्चा झाली असून, अद्याप अंतिम निर्णय झालेला नाही. – डॉ. सुहासिनी नागदा, महापालिका वैद्यकीय शिक्षण संचालक