न्यायमंडळातील कॉलेजियम सिस्टीम रद्द केली असतानाच आता निवडणूक आयोगामध्ये निवडणूक आयुक्त नेमताना कॉलेजियम सिस्टीमचा वापर करावा, असे मत केंद्रीय निवडणूक आयुक्त नसीम झैदी यांनी व्यक्त केले.
नवी दिल्ली- न्यायमंडळातील कॉलेजियम सिस्टीम रद्द केली असतानाच आता निवडणूक आयोगामध्ये निवडणूक आयुक्त नेमताना कॉलेजियम सिस्टीमचा वापर करावा, असे मत केंद्रीय निवडणूक आयुक्त नसीम झैदी यांनी व्यक्त केले.
निवडणूक आयोगामध्ये सध्या मुख्य निवडणूक आयुक्त व दोन अन्य आयुक्त असतात. सध्याची यंत्रणा चांगली आहे. सध्या सल्लागार यंत्रणा चांगली नसतानाही आयोगाचे काम नि:पक्षपाती, स्वतंत्रपणे सुरू आहे.
मात्र, आता सल्लागार यंत्रणा अस्तित्वात आणणे गरजेचे आहे. त्यामुळे आयोगाचे कामकाज अधिक चांगल्या पद्धतीने होऊ शकेल. काही वर्षापूर्वी सरकारने नेमलेल्या एका समितीने निवडणूक आयुक्तांची नेमणूक ही कॉलेजियम पद्धतीने करावी, अशी शिफारस केली होती.
केंद्रीय कायदा आयोगाने मुख्य निवडणूक आयुक्तांबरोबरच अन्य आयुक्तांची नेमणूक करताना तीन सदस्यांच्या कॉलेजियमचे मत घ्यावे, अशी शिफारस कायदा आयोगाने केली होती. या कॉलेजियम यंत्रणेत पंतप्रधान, लोकसभेचे विरोधी पक्षनेते, सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीशांचा समावेश असावा.
आयोगामध्ये तीन सदस्य असावेत ही बाब योग्य आहे. लोकशाहीतील सर्वात संवेदनशील घटकांसोबत निवडणूक आयोग काम करीत आहे. त्यामुळे तीन सदस्य त्यात असणे गरजेचे आहे. त्यामुळे कोणत्याही विषयावर विस्तृत चर्चा व योग्य निर्णय होऊ शकतो. मात्र तीनपेक्षा अधिक सदस्य असल्यास निर्णय घेण्यात अडचणी येऊ शकतात, असे झैदी यांनी सांगितले.