नवी मुंबई महापालिकेची सार्वत्रिक निवडणुकीचे मतदान २२ एप्रिल रोजी होणार असून प्रशासन व नवी मुंबई पोलीस सज्ज झाले आहेत.
नवी मुंबई- महापालिकेची सार्वत्रिक निवडणुकीचे मतदान २२ एप्रिल रोजी होणार असून प्रशासन व नवी मुंबई पोलीस सज्ज झाले आहेत. शहरातील १११ प्रभागांचे ३८ भाग करण्यात आले असून प्रत्येक प्रभागात ३८ सशस्त्र पोलीस अधिका-यांची नेमणूक करण्यात आली आहे.
या अधिका-यांसोबतच २ हजार ७०० पेक्षा अधिक पोलीस तैनात करण्यात आले आहेत. बंडखोरी वाढल्याने २० उमेदवारांना निवडणूक काळात संरक्षण पुरवावे लागणार आहे.
नवी मुंबई पोलीस दलातील २ हजार ५०० पोलीस आणि राज्य राखीव दलाच्या ३ कंपन्या शहरातील नाक्यांवर आणि मतदान केंद्रावर तैनात होणार आहेत. तर मतदानाच्या दुस-या दिवशी या भागात ‘ड्राय डे’ जाहीर केला आहे.
प्रचाराची रणधुमाळी संपल्यानंतर ८४६ उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद होणार आहे. तर मागील २० दिवसांत आचारसहिंतेचा भंग, हाणामारी आणि पैशांचे वाटप असे १७ अदखलपात्र आणि ८ दखलपात्र गुन्ह्यांची नोंद झाली आहे.
गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या १० जणांना तडीपार करण्यात आले आहे. १ हजार ७६ जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे अशी माहिती उपायुक्त शहाजी उमप यांनी दिली.
महापालिका निवडणकीचा प्रचार संपल्यानंतर सर्वच पक्षांनी आता निवडणुकीचे आडाखे बांधायला सुरुवात केली आहे. दिग्गज नेत्यांच्या सभांमुळे व आरोप प्रत्यारोपांमुळे महापालिका निवडणूक गाजली आहे. मात्र, मतदार राजा कुणाच्या पारडय़ात आपले मत टाकतो हे निवडणुकीनंतर स्पष्ट होणार आहे.